सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला तालुक्यातील जुनोनी परिसरात मागील पाच वर्षापासुन सुरू असलेल्या बेदाणा निर्मितीचा व्यवसाय सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या आर्थिक भरभराटीला चालना देणारा ठरला आहे.
या व्यवसायाने शेतीमालापासून ते बडे बागायतदार शेतकर्यांच्या जीवनात सुकाळ निर्माण झाला आहे. सांगोला तालुका दुष्काळीपट्टा व विकासापासून नेहमीच वंचित राहिला आहे. या तालुक्यातील मजूर मोलमजुरीवर जीवन जगतात. मजुराच्या हाताला जानेवारी ते एप्रिल पर्यंत काम मिळते. या काळात कुटुंबाची उपजीविका कशी चालवायची असा प्रश्न मजुरांना नेहमी सतावत असे व इथल्या अनुकूल हवामानामुळे बेदाणा निर्मीतीचा व्यवसाय झपाट्याने वाढला. जुनोनी परिसर जिल्हा सरहद्दीपर्यंत 400 ते 500 बेदाणा शेडस् उभारण्यात आले आहेत. दरवर्षी हजारो टन बेदाणा निर्मिती केली जाते. यामुळे परिसरातील दुष्काळात मजुराच्या हाताला हक्काचे काम मिळाले आहे. बेदाणा निर्मितीच्या हंगामात हजारो मजुरांचे हात शेडवर रात्रंदिवस चालत आहेत. बेदाणा शेडवर काम करताना मजूर कंत्राटी पध्दतीने कामे करतात. सर्वसाधारणपणे द्राक्षाचे क्रेट गाडीतून उतरविणे, रसायनात बुडविणे व सुकवण्यासाठी शेडवर टाकणे, 3 ते 4 रूपये किलोप्रमाणे मजुरी दिली जाते. बेदाणा निवडण्याचे काम महिला मार्फत केले जाते. त्यासाठी प्रति किलो 2 रूपये मिळतात. शेडवरील या कामाची पुरूषांना दिवसाला 300 ते 400 हजेरी मिळते तर महिला मजुरांना 250 ते 300 मिळतात. बेदाणा निर्मिती प्रक्रियेत द्राक्षे रसायनात बुडविणे, सुकविण्यासाठी शेडवर टाकणे त्यानंतर दुसर्या व तिसर्या दिवशी शेडवरील माल काढून मळणी करणे आदी टप्पे आहेत. एक किलो बेदाणा निर्मितीला 30 रू. खर्च येतो. या परिसरात मजुरांची ये-जा वाढू लागली आहे.
बेदाणा व्यवसायाशी संबंधित बेदाणा बॉक्स विक्रेते तसेच शीतगृह मालक या परिसरात फिरू लागले आहेत. यामुळे या भागातील दुष्काळात शेतकरी मजुरांचे जीवनमान उंचावले आहे.