नळदुर्ग -: वागदरी (ता. तुळजापूर) येथील ग्रामदैवत श्री संत सदगुरु भवानसिंग महाराज यांची यात्रा मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी भरत असून यात्रा कमिटीकडून जय्यती तयारी करण्‍यात आली आहे. यात्रेनिमित्‍त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. परिसरातील भाविक भक्‍तांनी याचा लाभ घेण्‍याचे आवाहन यात्रा कमिटीच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
    तुळजापूर तालुक्‍यातील वागदरी येथे दरवर्षी होळी सणाच्‍या नंतर सातव्‍या दिवशी एकनाथ षष्‍ठी नंतर श्री संत सदगुरु भवानसिंग महाराज यांची यात्रा भरते. यावर्षी ही यात्रा दि. 2 एप्रिल रोजी भरत आहे. यात्रेनिमित्‍ताने भजन, किर्तन करुन महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून परिसरातील भजनी मंडळ, दिंडी व भाविक भक्‍त मोठ्या संख्‍येनी उपस्थित राहतात. यात्रेपूर्वी एकनाथ षष्‍ठी दिवशी हरीजागर करण्‍यात येतो. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येते. यात्रेदिवशी सकाळी विविध ठिकाणाहून आलेल्‍या दिंडीचे आकर्षक पाऊल खेळले जाते व दुपारी दोन वाजता काला फोडला जातो.
    सध्‍याची दुष्‍काळी परिस्थिती व पाणीटंचाई लक्षात घेऊन विद्यमान सरपंच राजकुमार पवार यांनी ग्रामपंचायतीच्‍यावतीने यात्रेच्‍या ठिकाणी श्री भवानसिंग महाराज मंदिर परिसरात येणा-या भाविक भक्‍तासाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय म्‍हणून पाणपोईची व्‍यवस्‍था केली आहे. यात्रा उत्‍साहात पार पाडण्‍यासाठी यात्रा कमिटीचे ह.भ.प. सुरेशभाई परिहार, ह.भ.प. राजकुमार पाटील, शिवाजी मिटकर, विजयसिंह ठाकूर, श्री भवानसिंग महाराज भजनी मंडळ यांच्‍यासह ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौ. लक्ष्‍मी ठाकूर, सदस्‍य चंद्रकांत बिराजदार, सौ. कविता गायकवाड, सौ. सविता पाटील, सौ. सुवर्णा बिराजदार, ज्ञानेश्‍वर पाटील व ग्रामस्‍थ परि‍श्रम घेत आहेत.
 
Top