मुंबई -: स्वअस्तित्त्वासाठी सर्वांनी वन आणि त्यातील जैव विविधतेचे जतन करण्याचा निर्धार करुया, असे आवाहन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी उद्या दि. 21 मार्च जागतिक वनदिनानिमित्त  राज्यातील जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.
     डॉ. कदम आपल्या संदेशात म्हणतात, वनापासून होणारे अगणित फायदे आणि त्यामुळे त्यांच्या संवर्धनाची गरज जनमानसांवर ठसविण्यासाठी 21 मार्च रोजी जागतिक वनदिन साजरा करण्यात येतो. शासनाने वनीकरणाबाबत स्वीकारलेल्या कटिबद्धतेनुसार गेल्या वर्षी पावसाळ्यात वानिकी क्षेत्रामध्ये 75 हजार हेक्टर क्षेत्रावर 7 कोटी, 71 लाखाच्या वर रोपांची लागवड केली आहे. यासाठी रोपवाटीकेमध्ये साधारण 14 कोटी, 50 लाख रोपांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे रोजगारांची निर्मिती होवून 1 कोटीपेक्षा अधिक मनुष्यदिन निर्माण झाले. यातून पाणी व मातीचेही मोठ्याप्रमाणात संवर्धन झाले. राज्यातील 12 हजार 661 गावात असलेल्या संयुक्त व्यवस्थापन समित्यासंबंधी पर्यावरणपुरक आणि सकारात्मक दुरगामी परिणाम करणारे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. या समित्यांना त्यांच्या गावातील वनांच्या व्यवस्थापनाचे अधिकार देण्यात आले. त्यामध्ये 16 हजार कुटूंबियांना स्वयंपाकाकरिता शेगडी, सिलेंडर, बायोगॅस यासाठी 75 टक्के अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
     वने ही वन्यजिवांच्या अधिवासाची महत्त्वाची भूमिका वठवितात. राज्यात नवीन 8 संरक्षित क्षेत्र अधिसूचित करुन वन्यजीवन अधिवास क्षेत्रात 530 चौ.कि.मी. इतकी वाढ झाली आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांमुळे राज्यात वाघांच्या संख्येत वाढ दिसून येते. निसर्गपूरक आणि मूलभूत सोयी-सुविधांवर भर देण्यात येत असून वनांचे वन वणव्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापरावर भर देण्यात येत आहे.
     वन विभागाकडून वन आणि वन्यजीवांच्या संरक्षण आणि संगोपनासाठी भरीव कार्य करण्यात येत असून वाघांच्या संरक्षणासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची निर्मिती करुन 180 वनरक्षकांची भरती करण्यात आली आहे, असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे.
 
Top