महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .     
    सह्याद्रीची उंची आणि सखोलता जशी आहे तशीच माणसे सह्याद्रीने आपल्या कुशीत जन्माला घातली. छत्रपती शिवरायांनी ह्याच सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेऊन स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अटकेपार झेंडा रोवला. त्यानंतरही त्याच उंचीची आणि खोलीची माणसे सह्याद्रीने जन्माला घातली. त्यापैकी एक नांव यशवंतराव बळवंतराव चव्हाण.     यशवंतरावांचं शालेय शिक्षण सुरु असताना देशात स्वातंत्र्य चळवळींची धग पेटू लागली होती. सह्याद्रीचा छावा, चूप कसा बसणार ? देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण काही तरी केलेच पाहिजे. मित्रमंडळीही सगळी याच विचारांची. लोकांमधे जागृती निर्माण करायची. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात पत्रकं वाटायची. जमेल तसं रात्री अपरात्री चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मदत करायची. इकडे यशवंतरावांचं दहावीचं वर्ष. मन मात्र क्रांतिकारकाचं तयार होत होतं. शिक्षणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही हे समजत असूनही देशभक्ती, देशप्रेम स्वस्थ बसू देत नव्हतं. कायदेभंगासंबंधी लिहिलेली पत्रके, गांधीजींच्या अटकेबद्दल निषेध करणारी पत्रके आणि  झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचे आरोप ठेवून ब्रिटिशांनी यशवंतरावांना कैदेत डांबले.या वेळी यशवंतरावांचं वय होतं फक्त सोळा वर्षे.  आज सोळा वर्षाच्या मुलाला स्वातंत्र्य म्हणजे काय सांगता येणार नाही. देशभक्ती म्हणजे काय सांगता येणार नाही. सोळा वर्षाच्या यशवंतरावांना अठरा महिन्यांची कैद. ही साधी गोष्ट नव्हे. हे अठरा महिने कैदेत राहून त्यांनी क्षण अन् क्षण स्वतःच्या बौध्दिक आणि मानसिक संपन्नतेसाठी खर्च केला. वाढत्या वयाबरोबर बौध्दिक प्रश्नही गुंतागुंतीचे होत जातात. त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी त्यांनी कैदेत असतांना अफाट वाचन केलं. कालिदास, शेक्सपियर, गांधी, मार्क्स, लेनीन यांची मिळतील तेवढी पुस्तके अधाशासारखी वाचून काढली. कालिदासाच्या `शाकुंतल`चं सामूहिक वाचन कैदेत व्हायचं. बरट्रॅड रसेलचं `रोड्स टू फ्रिडम`, रशियन राज्यक्रांतीचं `टेन डेज, दॅट शुक द वर्ल्ड` हे जॉन रिडचं पुस्तक या पुस्तकांनी यशवंतरावांना अत्यंत प्रभावीत केलं. अठरा महिन्यांच्या कैदेतून बाहेर पडल्यावर एक संपन्न बुध्दिवंत, समाजकारणी यशवंतराव लोकांना दिसले.
     वाचनाचे संस्कार फार मोठे संस्कार असतात. विचार आचारात प्रगल्भता आणणारे असतात. कराडसारख्या गावातून निघालेले यशवंतराव थेट दिल्लीत पोहचतात, पंडित जवाहरलाल नेहरुंच्या विश्वासातले बनतात. यशवंतरावांची ही वाटचाल थक्क करणारी आहे.
    यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. भारताचे संरक्षणमंत्री, उपपंतप्रधान म्हणूनही राहिले. स्वतः ग्रामीण क्षेत्रामधून आले असल्यामुळे ग्रामीण भागातल्या  अडीअडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या  त्यांना माहीत होत्या.त्यांच्या हाती जेव्हा सत्ता आली तेव्हा पहिल्यांदा त्यांचे लक्ष ग्रामीण भागाकडे गेलं. विशेषतः जो महाराष्ट्राचा अविकसित भाग आहे, त्याच्यासाठी अधिक भाग भांडवल त्यांनी योजले होते. विदर्भ आणि मराठवाडा हा अविकसित भाग त्यांनी कधी दुर्लक्षीत केला नाही. `मी पाहिलेले यशवंतराव` या ग्रंथात पृ.295 वर भु.आ. कुलकर्णी लिहितात.
    ''1960-61 साली महाराष्ट्र राज्याची पहिली पंचवार्षिक योजना तयार केली. तीत महाराष्ट्रातील मागास विभागाबाबत साहेबांची जी मते होती ती स्पष्ट झाली आहेत.  तुलनेने अविकसित अशी विदर्भ व मराठवाडा या विभागासाठी जादा भांडवली तरतुदी करुन त्यांच्या विकासातील अनुशेष दूर करण्याचे तत्व प्रथमच या पंचवार्षिक योजनेच्या  दस्तैवजात मांडले गेले आहेत. साहेब दिल्लीस गेल्यावर या धोरणाचा पाठपुरावा नीटसा झाला नाही व उलट त्या धोरणाशी किंवा त्यांच्या मुळाशी असलेल्या  नागपूर कराराशी बांधिलकी नसल्यासारखाच कारभार होत राहिला. साहेबांचे मुख्यमंत्रीपद नव्या महाराष्ट्राला 1962 नंतर आणखी दहा वर्ष लाभले असते तर विकासात असमतोल कधीही आला नसता.''
     याचा अर्थ विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींनी विकासाच्या प्रक्रियेमधे लक्ष घातले नाही. यशवंतरावांनी समाजसेवेसाठी राजकारण केले. त्यांची सचोटी, प्रामाणिकपणा, आस्था, एकनिष्ठता या गुणांमुळे राजकारणात त्यांना पद मिळत गेली. विदर्भातील ग्रामीण भागातील अनेक नेत्यांच्या मागे ते उभे राहिले. विदर्भातील असंख्य नेत्यांनाही त्यांनी उजेडात आणले, त्यापैकी मा.सो.कन्नमवार, आबासाहेब खेडकर, मधुसूदन वैराळे, प्रा.राम मेघे, खा. बापुरावजी देशमुख, पी.के. देशमुख (अमरावती) यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. प्रा. राम मेघे यशवंतरावांबद्दल लिहितात.
         ''प्र बो ध आणि परिवर्तनाचा विचार करतांना यशवंतरावांनी राज्याच्या अविकसित आणि उपेक्षित भागांना नेहमीच झुकते माप दिले. विदर्भातील जल, वन आणि खनिज संपत्तीचा उपयोग करुन विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.''
      विदर्भातील पारस वीज केन्द्राची स्थापना, विदर्भातील औद्योगिक वसाहती यशवंतरावांच्या पुढाकारानेच निर्माण झाल्या आहेत. विदर्भातील ज्या नेत्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी बहुमोल कामगिरी विदर्भात केली आहे. वर्ध्याचे खा. बापुरावजी देशमुख आणि यशवंतरावांचे स्नेहबंधन अत्यंत भावनिक होते. देशमुख यांनी काढलेल्या शिक्षण संस्थेला यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था हेच नांव दिलं. योगायोग असा की सह्याद्रीचे हे दोन छावे एक शिवाजी भोसले आणि दुसरे यशवंतराव चव्हाण! विदर्भामधे शिक्षण क्षेत्रात अवतरले आहे. अमरावतीची शिवाजी शिक्षण संस्था आणि वर्ध्याची यशवंतराव ग्रामीण शिक्षण संस्था. यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळा-कॉलेजेस जिल्ह्यात बहुतांशी सर्व गावातून आहेत.   
          विदर्भात स्वतंत्र कृषी विद्यापीठासाठी आंदोलन सुरु होते. अमरावतीत तरुण शेतकऱ्यांची मुलं पोलिसांच्या गोळ्यांना मृत्युमुखी पडली होती. या संदर्भात खा. टी.जी.देशमुख यांनी यशवंतरावांशी केलेला संवाद फार अर्थपूर्ण आणि यशवंतरावांची विदर्भाच्या संदर्भातील औदार्याची भूमिका स्पष्ट करणारा आहे. "विदर्भाचे राज्यच आम्ही मागत होतो ते उगीच नाही. आज दहा खासदार.... आम्ही एकत्र येऊन कृषी विद्यापीठ विदर्भात झाले पाहिजे असे निवेदन देणार आहोत. आम्हाला  ठाऊक आहे तुम्ही काहीएक शब्द बोलणार नाही !"
     ''टी जी. रागात असले म्हणजे तुमच्या वाणीला बहर येतो. पण इतरांना बोलण्याची संधी द्याल की नाही ?' यशवंतराव.
      'तुम्ही हेच म्हणणार ना की, काँग्रेसची शिस्त पाळली पाहिजे अन महाराष्ट्राची महान परंपरा जपली पाहिजे' टी.जी. म्हणाले.    'टी.जी. जरा दम खा. माझं उत्तर तुम्ही  देऊ नका. विदर्भात कृषी विद्यापीठ झालं पाहिजे असे तुम्ही निवेदन काढणार आहात ना, मग त्याचे शेवटी लिहा, यशवंतराव चव्हाणांचा आम्हाला पाठिंबा आहे.'
    निवेदनाच्या शेवटी टी.जी.नी ओळ टाकली. आमच्या या मागणीस अर्थमंत्री यशवंतराव चव्हाणांचा आशीर्वाद आहे. विदर्भ विकासासाठी यशवंतरावांचा हातभार लागला आहे. आणखी काही काळ त्यांच्या जवळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असतं तर कदाचित विदर्भाचा चेहरामोहरा बदलला असता. पण दिल्लीचं बोलावणं असल्यामुळे मुख्यमंत्रीपद सोडून त्यांना दिल्लीला जावं लागलं.
     एक साहित्यिक, लोकसंग्राहक धीरगंभीर वृत्ती असलेले यशवंतराव आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. ज्यांना ज्यांना राजकारणात पडायचं आहे, ज्यांना ज्यांना नेतृत्व करायचं आहे अशा लोकांनी तर यशवंतरावाचं 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र वाचलंच पाहिजे. एक आदर्श संस्कार संपन्न पिढी जर घडवायची असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांने 'कृष्णाकाठ' एकदा वाचलच पाहिजे.
 
* प्रा.नवनीत देशमुख
 
Top