नळदुर्ग -: किलज (ता. तुळजापूर) गाव व त्‍यांतर्गत येणा-या वाडी, वस्‍तीवर पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न भेडसावत आहे. पाच हजार लोकसंख्‍या असलेल्‍या किलज गावासाठी दोन टँकरने पाणीपुरवठा करण्‍यात येत असून यामधूनच जनावरांनाही पाणी द्यावा लागतो. त्‍यामुळे पाणी अपुरा पडत असून जलसंकट निर्माण झाल्‍याने टँकरची संख्‍या वाढविण्‍याची मागणी सरपंच राजेंद्र राठोड यांनी केली आहे.
       सर्वत्र जलसंकट ओढावले असून तुळजापूर तालुक्‍यातील किलज गावात पाण्‍याची समस्‍या अधिक जाणवत आहे. किलज ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या आमराई तांडा, यशवंतनगर, कुंभारदरा, मारखोरी तांडा, गवंडी तांडा, सिमदरातांडा, भोईटे वस्‍ती आदी ठिकाणी बोअर अधिग्रहण करण्‍यात आले असले तरी बोअरला पाणी कमी होत चालल्‍याने पाण्‍याचा प्रश्‍न तीव्र बनत चालले आहे. किलज येथे एकदिवसाआड दोन टँकरने पाणीपुरवठा करण्‍यात येत असून तो सध्‍या अपुरा पडत आहे. पाण्‍याचा टँकर गावात आल्‍यावर महिला, पुरुष, लहान बालकासह ग्रामस्‍थांचे पाण्‍यासाठी एकच झुंबड उडते. पाणी मिळविण्‍यासाठी सर्वांना गोंधळातच कसरत करावी लागते. त्‍यातच महिला व बालकांची मोठी तारांबळ उडत असल्‍याचे दृश्‍य पहावयास मिळते. पाण्‍याच्‍या टँकरमध्‍ये पाईप टाकून जो तो आपापल्‍या परीने जास्‍तीत जास्‍त पाणी उपसण्‍याचा प्रयत्‍न करताना दिसून आले. सरपंच राजेंद्र राठोड हे ग्रामस्‍थांना पाणीपुरवठा सुरळीत होण्‍यासाठी प्रयत्‍नशील असून वाढीव टँकरची मागणी व त्‍या संदर्भात संबंधित विभागाला पत्र व्‍यवहार केल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
 
Top