सांगोला (राजेंद्र यादव) -: ‘‘म्हैसाळ योजनेचे पाणी आज कोरडा नदीत सोडण्याचा हा क्षण भविष्याचा वेध घेणारा क्षण असून येत्या वर्षभरात टेंभूचे पाणी सांगोला तालुक्यात येईल’’ असा आत्मविश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री नाम. रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
    सांगोला तालुक्यातील गळवेवाडी येथे कृष्णा कोयना उपसा जलसिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळचे पाणी सांगोला तालुक्यातील कोरडा नदीत सोडल्यानंतर जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार गणपतराव देशमुख, आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, आमदार भारत भालके, माजी आमदार शहाजीबापू पाटील, जि.प.अध्यक्षा निशिगंधा माळी, सभापती जयमाला गायकवाड, नगराध्यक्ष मारुती बनकर, बाबुराव गायकवाड, प्रा. पी.सी.झपके, रफिक नदाफ, श्रीकांत देशमुख, भाजपाचे शिवाजीराव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, शिवसेना तालुका प्रमुख मधुकर बनसोडे, कमरुद्दीन खतीब, पं.स.सभापती ताई मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी कोरडा नदीत पाणी सोडल्यानंतर मंत्र्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मंत्री नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, कृष्णा उपसा सिंचन योजना आज कै. आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या पुण्यतिथीदिवशी तालुक्यात साकार होत आहे. हे पाणी तुमच्या वाट्याचे आहे. जत, कवठेमहांकाळचे पाणी सांगोला, मंगळवेढ्याला देत नाही. पाण्यासारख्या विषयावर सांगोला तालुक्यातील सर्व पक्षीय नेते एकत्र येतात ही आनंदाची बाब आहे. राजकीय शक्ती अशा प्रश्नांच्या मागे उभी केली, त्यामुळेच हे पाणी आले आहे. शेतीसाठी वापरात येणारे पाणी हे ठिबक योजनेद्वारेच वापरणे बंधनकारक केले तरच समन्यायी पाण्याचे वाटप होईल असेही त्यांनी सांगितले. कृष्णा महामंडळाची आजही 18 हजार कोटी रुपयांची प्रकल्प कामे अपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
      पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील पाणीप्रश्न सुटू लागले असून त्याचाच एक भाग आजचा आहे. ‘‘वडीलांनी दिलेले वचन मुलगा पूर्ण करतो आहे’’ असे सांगत आमदार दिपकआबांच्या कार्याचे कौतुक केले. या योजनेतून सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येकी 15 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
        प्रास्ताविकात आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी तहानलेल्या तालुक्याला पाणी मिळावे यासाठी राजकारणाची पादत्राणे बाजूला ठेवून आम्ही नेहमीच एकत्र येत असल्याचे सांगून भीषण दुष्काळात कृष्णामाई भीमामाईचा हा संगम ऐतिहासिक क्षण ठरला असून कै. काकासाहेबांचे पाण्याचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना आमदार गणपतराव देशमुख यांनी आजचा हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे सांगून पिढ्यानपिढ्या चालत आलेला दुष्काळ दूर होण्यास सुरवात झाल्याचे सांगून म्हैसाळ योजनेसाठी केंद्र सरकार 90 टक्के निधी देते परंतु उर्वरित 10 टक़्के निधी राज्य सरकार देवू शकत नाही हे दुर्दैव आहे. याची दखल राज्य सरकारने घ्यावी असे सांगितले.
    यावेळी भारत भालके यांनी म्हैसाळचे हे पाणी माण नदीत सोडून मंगळवेढेकरांची तहाण भागवावी अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील, चंद्रकांत देशमुख, श्रीकांत देशमुख, गोरख घाडगे, जयमाला गायकवाड, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला कृष्णा महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, सांगोला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top