नळदुर्ग :- ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणीच्या काळात सहकारी बँकांनी मदतीचा हात देवून स्वत:चीही उन्नती साधावी, त्यादृष्टीने रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी करीत असलेले काम कौतुकास्पद असल्‍याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे केले.
    नळदुर्ग येथे रुपामाता मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., उस्मानाबादच्या नळदुर्ग शाखेचा उदघाटन सोहळा पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या हस्ते रविवार रोजी झाला. याप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, नरेंद्र बोरगांवकर, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, रुपामाताचे संस्थापक चेअमरन अँड. व्यंकटराव गुंड, नगराध्यक्ष शब्बीर सावकार, उपनगराध्यक्ष शहबाज काझी, जि. प. सदस्य सुधाकर गुंड, बँकेचे संचालक राजाभाऊ वैद्य, माजी नगराध्‍यक्ष
उदय जगदाळे, दत्तात्रय दासकर,  नगरसेवक तथा शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख कमलाकर डुकरे, कौसर पाशा मझहर जहागीरदार आदिंची उपस्थिती होती.
     यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, लोकांच्या विश्वासास सहकारी बँकांनी पात्र ठरणे ही खरोखरच जिकीरीची गोष्ट आहे. अशावेळी ग्रामीण भागातील नागरीकांना मदतीचा हात देणारी, शेतक-यांच्या माल तारणावर कर्ज उपलब्ध करुन देणारी रुपामाता सोसायटीने ग्राहकांचा विश्वास कमावला आहे. हा विश्वास त्यांनी कायम ठेवावा. नळदुर्ग शहर व आसपासच्या परिसरात अनेक लहानमोठे व्यावसायीक आहेत. या व्यावसायीकांना या बँकेचा निश्चितपणे लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    चांगले काम करणा-यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका आपण नेहमीच ठेवली आहे. यापुढेही आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे सांगून पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, सध्या पाणीटंचाईची परिस्थीती संपूर्ण जिल्ह्यात आहे. पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी शासन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
    सि.ना. आलुरे गुरुजी, नरेंद्र बोरगावकर आणि आप्‍पासाहेब पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. आपल्या प्रास्ताविकात अँड. गुंड यांनी बँकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास संस्थेंचे सर्व संचालक,शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top