बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : पावसाचे पाणी आल्यावर नेहमी चर्चेत राहणार्‍या घोर ओढ्याने दि. ३ जुलैच्या सायंकाळी बार्शी व वैराग येथील सात जणांचा बळी घेतला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बार्शीत मोठा पाऊस झाल्याचा संभ्रम निर्माण झाला व त्यामुळेच दुष्काळाच्या यादीतून वगळले गेले.
     यातील दुर्देवी अंत झालेले शांतीलाल काका गांधी हे सोपल समर्थक तसेच प्रसिध्द व्यापारी असल्याने त्यांच्या नावावरुन काहीजणांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. सदरच्या ओढ्यानजीक असलेल्या रेल्वे पुलाला तर ऐतिहासिक तसेच जगातील आठवे आश्चर्य म्हणूनही ओळख झाली होती. त्याचे कारणही तसेच होते, या पूलाचे बांधकामच असे आहे की याचा केलेला उतार हा प्रत्येक वाहनाला त्या पूलात आणून सोडतो व या पुलात रिमझिम पाऊस पडला तरी रस्त्याच्या वर पाणी येऊन रहदारीला अडथळे निर्माण होतात.
     अत्यावश्यक गरजेसाठी उपाययोजना करावी व ती केवळ कागदोपत्री केल्यानेच सदरच्या घटनेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले यामुळे या पुलाचा प्रश्न चव्हाट्यावर आला.  सदरच्या ठिकाणी मदत कार्यावरुनही श्रेय लाटण्याच्या गोष्टी घडल्या तसेच घटनेनंतर बांधकाम विभागाने काहीतरी केल्याचे नाटक करीत किरकोळ सिमेंटचे पोल उभे केले ते काही तासांतच भुईसपाट झाले.
     मध्यंतरी सदरच्या पूलाचे काम कित्येक वर्षे सुरु असल्याने शेजारील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यावर याला कोणीच वाली नसल्‍याने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्‍त भाऊसाहेब आंधळकर यांनी स्वत:च्या पैशाने रस्त्याचे काम करुन राजकारणी लोकांचे डोळे उघडून झोपमोड केली.     सध्या निवडणूकांपूर्वीच वातावरण तापण्यास सुरुवात झाल्याने विविध विकासकामांना गती आली आहे.
     बार्शीच्या राजकारणातील अभ्यासू नेतृत्व आमदार दिलीप सोपल यांनी सदरच्या प्रकरणाला गांभीर्याने घेत घोरओढा पुल, रामेश्वर मंदिर पुल, जामगाव रोड पूल, कासारवाडी पूल इत्यादी पूलांच्या बाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करुन अंमलबजावणीसाठी निधीची उपलब्ध करुन मंजूरी आणली.
     राज्य शासनाकडून सतत पाठपुरावा करत 12 कामांसाठी 7 कोटींचा निधी मिळाला असून यामध्ये बार्शी शहरातील पोस्ट ऑफिस चौक ते रेल्वे उड्डान पूल रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामास 75 लाख, सोलापूर रोडवरील रेल्वे उड्डानपूल नजीकच्या घोरओढा पूलाचे बांधकाम 90 लाख, रामेश्वर मंदिर नजीकचा पूल रुंदीकरण व बांधकाम, जामगाव रोडवरील पूल बांधकाम 60 लाख, कव्हे-कोरफळे रस्त्यावरील कासारवाडी घोरओढा पूल बांधणे 30 लाख, बार्शी-सोलापूर रस्त्यावरील राळेरास पूल बांधकाम 3 कोटी 50 लाख, माढा-वैराग रोवरील सुर्डी गावानजीक 2 कि.मी. रस्ता डांबरीकरण 60 लाख, मोहोळ-वैराग रस्त्यावरील मुंगशी (वा.) ते तालुका हद्द 90 लाख, बार्शी उस्‍मानाबाद रोडवरील तांदुळवाडी पूल ते चिखर्डे रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण 70 लाख, मोहोळ-वैराग रस्त्यावरील वैराग हद्दीतील पूल बांधकाम 30लाख, बार्शी - गाडेगाव देवगाव रस्त्यावरील देवगाव मांजरे वस्ती ते जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण 30 लाख, बार्शी आगळगाव भूम रस्त्यावरील काटेगाव ते चुंभ रस्ता डांबरीकरण 1 कोटी 17 लाख, वैराग हिंगणी मळेगाव रस्त्यावरील हिंगणी ते मळेगाव रस्ता डांबरीकरण करणे 1 कोटी 3 लाख अशा एकूण 7 कोटी रुपयांच्या विकास कामांची 18 कामे हाती घेण्यात आली आहेत. सदरच्या कामाची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु असून लवकरच कामांची प्रत्यक्ष सुरुवात हाणार असल्याचे आ. सोपल यांनी सांगीतले.
 
Top