आ. गणपतराव देशमुख
सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला तालुक्यातील रखडलेल्या टेंभू, म्हैशाळ, निरा उजवा कालवा व सांगोला उपसा सिंचन (उजनी 2 टी.एम.सी.) योजनांसाठी सुमारे 66 कोटी रुपयांची राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली आहे. उजनीच्या उपसा सिंचन योजनेच्या निविदा काढल्या असून येत्या वर्षभरात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याची माहिती आ. गणपतराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 
       सांगोला तालुक्यात पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तालुक्यासाठी टेंभू, म्हैशाळ, निरा उजवा कालवा व सांगोला उपसा सिंचन (उजनी 2 टी.एम.सी.) पाण्यातून सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहेत. या रखडलेल्या योजनांची कामे मार्गी लागावीत यादृष्टीने आ. देशमुख यांनी राज्यसरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. राज्याच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. गणतपराव देशमुख यांनी या योजनांच्या रखडलेल्या कामासाठी भरीव निधीची तरतूद केल्यास कामे मार्गी लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. 
     आ.गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेवून रखडलेल्या टेंभू योजनेसाठी सन 2012-13 मध्ये 79 कोटी मंजूर केले होते. त्यापैकी मंजूर निधीतील फेब्रुवारी अखेर 6 कोटी रुपये दिले होते. तर सन 2013- 14 मध्ये 73 कोटी रुपये मार्च अखेर मिळाले आहेत. टेंभूसाठी मिळालेल्या निधीतून माहूली पर्यंत पाणी आले असून आटपाडी तालुक्यातील घानंद येथून सांगोल्याला येण्यासाठी 85 कोटी रुपयांची गरज असून 73 कोटी रुपये मुख्यमंत्र्यानी दिल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. म्हैशाळ योजनेसाठी ए.आय.बी.पी. तून 152 कोटी रुपयांची तरतूद केली असून सोलापूर जिल्ह्यासाठी 9 कोटींची तरतूद केली आहे. टेंभू व म्हैशाळ योजनेतील पाणी मिळाल्यास माण व कोरडा नदी पात्राच्या शेजारील 30-30 गांवातील क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. निरा उजवा कालवा अंतर्गत सांगोला शाखेच्या कामासाठी 22 कोटी 17 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर प्रथमच उजनीतील 2 टीएमसी उचल पाणी सांगोला उपसायोजनेसाठी निधीची तरतूद केली असून या कामाच्या निविदाही काढण्यात आली असल्याची माहिती आ. गणपतराव देशमुख यांनी दिली आहे. तालुक्याच्या प्रलंबीत शेतीच्या पाण्यासाठी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात टेंभू योजना - 25, म्हैशाळ योजना - 9 कोटी, निरा उजवा कालवा (सांगोला शाखा प्रकल्प) कामासाठी - 22 कोटी 17 लाख 50 हजार तर उजनीच्या सांगोला उपसा योजनेसाठी 10 कोटी अशी सुमारे 66 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन योजनासाठी आष्टी उपसा सिंचन 16, बार्शी 32, दहिगांव 28, एकरुख 38, शिरापूर 18, सीना माढा 25 अशी सुमारे 157 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली असल्याचे सांगितले.
 
Top