नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतीच्‍या सदस्‍यांनी सरपंच, उपसरपंचाविरूद्ध मनमानी करुन गैरप्रकार करीत असल्‍याची खळबळजनक तक्रार उस्‍मानाबाद जिल्‍हापरिषदेचे मुख्‍यकार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांच्‍याकडे केली आहे.
    तुळजापूर तालुक्‍यातील अणदूर ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन तीन वर्षे झाली. ग्रामपंचायतीमध्‍ये सतरा सदस्‍य असून सरंपचासह दोन-तीन सदस्‍यच कारभार करतात. इतर सदस्‍यांना विश्‍वासात न घेणे, योजनांची माहिती न देणे, सरपंच, उपसरपंचाची मनमानी, मोठ्याप्रमाणात गैरप्रकार, खाते नं. 1 चीच माहिती बैठकीत देणे, दोन व तीन नंबरच्‍या खात्‍याची माहिती दडवून ठेवणे, तेराव्‍या वित्‍त आरोग्‍याच्‍या पैशाचा हिशोब न देणे याच्‍यासह इतर गंभीर आरोप ग्रामपंचायतीचे सदस्‍य अरविंद आलुरे, हाजीमलंग शेख, सुशांत आलुरे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्‍याचबरोबर त्‍यांनी या गैरप्रकाराविरोधात जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांच्‍याकडे लेखी निवेदन दिल्‍याने एकच खळबळ उडाली आहे.
    अणदूर ग्रामपंचायत ही जिल्‍ह्यातील सर्वात मोठी व प्रतिष्‍ठेची ग्रामपंचायत ओळखली जाते. या ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची सत्‍ता असून चार सदस्‍य सेना-भाजपाचे आहेत. यातील नऊ सदस्‍यांनी जि.प. मुख्‍य कार्यकारी अधिका-यांना दिलेल्‍या तक्रारीवर सह्या केल्‍याने व लेखा परिक्षणाची मागणी केल्‍याने सत्‍ताधा-यांमध्‍ये खळबळ माजली आहे. या निवेदनाबाबत आपली भूमिका मांडण्‍यासाठी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत सदस्‍य अरविंद आलुरे, हाजीमलंग शेख, सुशांत आलुरे म्‍हणाले की, गावात पाणी असून मात्र नागरिकांना पाणीटंचाईला सामोर जावे लागत आहे.  कर्मचा-यांना वेळेवर वेतन मिळत नाही, विषय समित्‍या फक्‍त कागदोपत्रीच आहेत. दक्षता समितीची बैठक घेतली जात नाही. मागासवर्गीय स्‍मशानभूमी दुरुस्‍तीसाठी आलेली रक्‍कम परत गेली तर तीन अंगणवाडी बांधकामाचा निधी परत जाण्‍याच्‍या मार्गावर आहे.
    ग्रामपंचायतीचे ई-ट्रेंडर, ग्रामपंचायतीच्‍या सरपंच, उपसरपंच, सदस्‍यांना ग्रामपंचायतीची कामे करता येत नाही. दुस-यांच्‍या नावावर काम घेऊन सरपंच, उपसरंच कामे करतात, असे घणाघाती आरोप या नऊ सदस्‍यांनी केले आहे. सदरील निवेदनावर 17 पैकी 9 सदस्‍यांच्‍या स्‍वाक्ष-या असून मुख्‍यकार्यकारी अधिका-यांनी याबाबत कोणतीही कारवाई न केल्‍यास याविरोधात ग्रामविकास मंत्र्याकडे दाद मागणार असून लोकशाही पध्‍दतीने आंदोलन करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सदरील पत्रकार परिषदेत अरविंद आलुरे, सुशांत आलरे, अरविंद आलुरे, अजीमलंग श्‍ेख, तंटामुक्‍त समितीचे सचिव इमाम शेख आदीजण उपस्थित होते. जि.प.च्‍या मुख्‍य कार्यकारी अधिका-यांकडे दिलेल्‍या निवेदनावर सुशांत आलुरे, हाजीमलंग आलुरे, अरविंद आलुरे, सौ. संजिवनी आलुरे, सौ. तेजाबाई गायकवाड, सौ. सत्‍यशिला चव्‍हाण, नागनाथ सुरवसे, अशोक मुकरे, शिलादेवी चव्‍हाण या नऊ सदस्‍यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.
    ग्रामपंचायतीचा कारभार अत्‍यंत पारदर्शक असून सर्वच ठरावांवर आरोप करणा-या सदस्‍यांच्‍या सह्या आहेत. गत तीन वर्षापासून पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, माजी आमदार सि.ना. आलुरे गुरूजी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आम्‍ही व्‍यवस्थितरित्‍या करीत आहोत. त्‍यामुळे वरील नऊ सदस्‍याचे आरोप हे बिनबुडाचे व राजकीय हेतूने प्रेरित असल्‍याचे सांगून याबाबत होणा-या कोणत्‍याही चौकशाला सामोरे जाणार असल्‍याचे सरपंच शशिकला शेटे यांनी सांगितले.
 
Top