
तुळजापूर तालुक्यातील मुर्टा-मानमोडी ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणुक काही महिन्यापूर्वी होऊन या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा प्रगतशील शेतकरी सत्यवान सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक कामे करुन सर्वसामान्य ग्रामस्थाना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिले जात आहे. याकामी ग्रामपंचायतीचे महिला सरपंच सौ. मेघा लक्ष्मण कदम, उपसरपंच सत्यवान सुरवसे, युवा कार्यकर्ते गोपाळ सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता करदुरे, सुमनबाई लाखे, आशाबाई गुंजकर, शांताबाई राठोड, जयसिंग गवळी, बळीराम गायकवाड, माजी सरपंच मधुकर सुरवसे आदी सतत प्रयत्नशील आहेत.
मुर्टा गावात बेकायदेशीर छुपे दारु विक्रेत्यांची संख्या पाचपेक्षा अधिक आहे. दारुच्या व्यसनामुळे अनेकांचे संसारावर उध्दवस्त होत आहेत. गावामध्ये बाहेर गावाहून दारु आणून विकल्या जातात. बेकायदेशीर दारु विक्री होत असल्याने सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. दारू दुकानांमुळे व्यसनाधीन तरुण पुरुषांची संख्या वाढत चालल्याने त्यातून गावात वाद, भांडणतंटे, एकोपा तुटत चालले. बुधवार दि. 6 मार्च रोजी दारुमुळे अंगुले कुटुंबियात भांडण झाले. त्यातून रंजना अंगुले या विवाहितेने अंगावरुन रॉकेल ओतून पेटवून घेऊन गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने सत्यवान सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी पुढाकार घेऊन गावातील दारुबंदी तात्काळ बंद करण्यासाठी एकमुखी निर्णय घेतला. दारुबंदीबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर यांना कळविण्यात आले. त्यांनी गुरुवार दि. 7 मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यासह पोलीस कर्मचारी मुर्टा गावाकडे पाठविले. त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पी.आय. कदम व त्यांचे सहकारी सकाळी दहा वाजता पंचक्रोशित दाखल झाले असता मुर्टा-मानमोडी गावचे सुमारे तीनशे पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बैठक घेऊन दारुच्या व्यसनाचे दुष्परिणाम सांगून तात्काळ दारुबंदी बाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर महिला सरपंच सौ. कदम, ग्रामपंचायत महिला सदस्यासह सर्व ग्रामस्थांनी आणि पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचा-यांनी गावातील व गावालगत असलेल्या दारु विक्रेत्यांच्या दुकानात जाऊन झडती घेऊन बेकायदेशीर धंदे करुन नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस देऊन भविष्यात कठोर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला महिलांनी उचललेले आक्रमक पाऊल निश्चितच योग्य असून इतरांनीही मूर्टाच्या रणरागिणींनीची प्रेरणा घेण्यासारखीच आहे.
* शिवाजी नाईक