सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला तालुक्यात कितीही प्रचंड दुष्काळी परिस्थिती असली तरी सुध्दा आजही साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे आणि भविष्य काळात देखील सभासदांच्या मालकीचाच रहावा यासाठी हा कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबतचा विषय सभासदांनी एकमताने मंजूर केला असल्याची माहिती सांगोला साखर कारखान्याचे चेअरमन आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी दिली.
     सांगोला सहकारी साखरकारखान्याची सन 2010-11,व 2011-12 ची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी कारखान्याच्या कार्यस्थळावर आ. दिपपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना आ. साळुंखे पाटील बोलत होते. आजपर्यंत सांगोला साखर कारखान्याने सन 2001 पासून पाच हंगाम पार पाडले असल्याचे सांगून आ. दिपकआबा साळुंखे-पाटील पुढे म्हणाले, या पाच हंगामामध्ये सतरा कोटीची कर्जफेड केली, परंतू दुष्काळी परिस्थिती मुळे कारखान्याला सहा हंगाम करता आले नाहीत. त्यामुळे सतरा कोटीची रक्कम मुद्दलाऐवजी व्याजामध्येच जमा करावी लागली. दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखान्याला प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. राज्य बँकेकडून कारखाना मोडीत काढण्याचे आदेश होऊन सुध्दा सदरचे आदेश सक्षमपणे परतविण्यामध्ये संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. भविष्यात सांगोला साखर कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहिल अशा पध्दतीचा निर्णय घेऊन भाडेतत्वावर कारखाना देण्याबाबतचा विषय सभासदांनी एकमताने मंजूर केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कारखान्याचे मार्गदर्शक आ. गणपतराव देशमुख यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेतक-यांच्या जीवनाशी निगडीत असलेला तालुक्यातील हा उद्योग असल्यामुळे आपण नेहमीच सहकार्याची भूमिका घेऊन सातत्याने मदत केलेली आहे. भविष्य काळात देखील सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कारखाना सभासदांच्या मालकीचाच कसा राहिल याबाबत आपण काळजी घेणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंतराव कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात कारखान्याबद्दलची माहिती दिली. सांगोला तालुक्यात मागच्या दोन-तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कारखान्यापुढे अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये थोडाफार गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सभासदांच्या हिताचेच निर्णय यापुढच्या काळातही घेतले जातील. कोणाला कारखान्या संदर्भात सविस्तर माहिती हवी असल्यास त्यांनी कारखान्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी व असलेला गैरसमज दूर करावा, असे आवाहनही कार्यकारी संचालक कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन जयवंत नागणे यांनी तर व्हा.चेअरमन विश्वनाथ चव्हाण यांनी आभार मानले. या सभेस जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांतदादा देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, नगरसेवक अनिलभाऊ खडतरे, पं.स.सदस्य बिरा गेजगे, सोनंदचे सतिशका शिंदे-पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक विजय येलपले यांच्यासह कारखान्याचे संचालकमंडळ, करखान्याचे अधिकारी वकर्मचारी, शेतकरी सभासद बांधव मोठ्या संख्येने हजर होते.
-
 
Top