महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 मार्च 2013 रोजी मुंबई येथील एनसीपीए सभागृहात होणार आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख. . .   

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरुपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या दृष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते.  विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच त्याची महाराष्ट्र राज्यामध्ये यशस्वी अंमलबजावणी करुन, प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी  देशपातळीवर देखील दाखवून दिला होता. सामान्य माणूस हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्र राज्याचा लौकिक एक प्रागतिक राज्य असा देश पातळीवर निर्माण केला.
     महाराष्ट्र राज्यामधील तरुण पिढी ज्यांच्या वैचारिक शिदोरीवर वाढली, अशा पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून मला यशवंतराव जसे दिसले, जसे भावले ते या लेखाद्वारे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. अर्थात ही वैचारिक शिदोरी कोणती? हा विचारही या ठिकाणी महत्वाचा आहे. प्रखर राष्ट्रभावना, लोकशाहीवर प्रचंड निष्ठा, धर्मनिरपेक्षता, माणसा-माणसातील सद्भावना, जाती-पातीचा विचार न करता समाज जीवनाचा विविध क्षेत्रामध्ये गुणांची पूजा या मूल्यांवर यशवंतराव ठाम होते व हीच मूल्ये युवकांमध्ये रुजावीत यासाठी ते प्रयत्नशील होते.  महाराष्ट्रातील समाज एकसंघ ठेवण्यामध्ये यशवंतरावजींचे हे योगदान कधीही विसरता येणार नाही. काही महत्वाच्या सार्वजनिक प्रसंगी यशवंतरावजींना पाहण्याचा विद्यार्थीदशेत मला योग आला.
चीनच्या भारतावरील आक्रमणानंतर पंडित जवाहरलाल नेहरुंनी यशवंतरावजीनां दिल्लीला बोलावून घेतले. हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्रीने धाव घेतली या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे या नेतृत्वाबद्दल सतत आकर्षण होते. परंतु या ऐतिहासिक गोष्टीमुळे, देशपातळीवरील एक प्रभावी व्यक्तिमत्व ही त्यांची ओळख महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात निर्माण झाली होती. हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच 1970 व 1980 च्या दशकात यशवंतरावजींच्या सभांना तरुणांची गर्दी होत असे. परंतु यशवंतराव अशा सभांमधून अतिशय सहजपणे  श्रोत्यांशी  संवाद  साधत,  त्यांच्या  वैचारिक  भूमिकेवर  प्रभाव  पाडत,  शेवटपर्यंत भाषणावर आपली पकड ठेवत. अत्यंत साधी परंतु नीटनेटकी वेषभूषा-विशेषत: त्या काळात पंडितजी जसे जाकीट घालत त्याच पध्दतीचे जाकीट व रुबाबदार चालणे हे जसे वैशिष्ट्यपूर्ण होते तसेच श्रोत्यांशी संवाद साधण्याची हातोटी ही 1970 च्या तरुण पिढीला आकर्षित करणारी गोष्ट होती.
1976 मधील प्रसंग मला आठवतो. छत्रपती शाहू महाराजांच्या नावांने स्थापन झालेल्या व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे आताच्या सायबरच्या उद्घाटनासाठी यशवंतराव कोल्हापुरात आले होते. त्या उद्घाटनप्रसंगी श्रोत्यांमध्ये मी हजर होतो. 
     व्यासपीठावरील व्यक्तींमध्ये माझ्या आठवणीप्रमाणे वसंतदादा पाटील, कवी ग.दि.माडगुळकर इत्यादी मंडळी होती. यशवंतराव उद्घाटन प्रसंगी काय बोलतात याची आम्हा विद्यार्थ्यांना उत्सुकता होती.  उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम आटपून, यशवंतराव बोलण्यासाठी उभे राहिले.  आपण पदव्युत्तर व्यवस्थापन व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या उद्घाटनासाठी आलो आहोत याची पूर्ण जाणीव त्यांना होती.  त्यांचे भाषण लिखित स्वरुपात असले तरी देखील ते फक्त त्याचा आधार घेऊन बोलत होते.  परंतु श्रोत्यांशी असलेला संवाद त्यांनी खंडीत होऊ दिला नाही.  त्यांनी विकसनशील देशांना व्यवस्थापनाची
का गरज आहे हे भाषणाचे सूत्र ठेवून बोलण्यास सुरुवात केली व बघता बघता एखाद्या सराईत व्याख्यात्याप्रमाणे पाश्चात्य देशांची उदाहरणे देऊन, व्यवस्थापन शिक्षण ग्रामीण महाराष्ट्रात का आवश्यक आहे हे सांगण्यास सुरुवात केली.  विकासाभिमुख प्रशासनाकरिता फक्त उत्तम आर्थिक नीतीचा अवलंब करुन चालत नाही.  तर त्यासाठी त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता उत्तम व्यवस्थापकांची गरज असते व असे व्यवस्थापक ही संस्था घडवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.  विद्यार्थी दशेमध्ये यशवंतरावांचे भाषण माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले व त्याचा परिणाम म्हणून मी व्यवस्थापनाशी निगडीत शिक्षण व प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये माझ्या करियरची निवड केली.  मला खात्री आहे की, माझ्या सारख्या अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्या काळात व्यवस्थापन शिक्षणाला प्राधान्य देऊन करियर म्हणून त्याची निवड केली.  त्याचे श्रेय निश्चितपणे यशवंतरावजींच्या या भाषणाला द्यावे लागेल.
     त्यांच्या भाषणातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आर्थिक विकासासाठी विकसनशील देशांनी उत्तम व्यवस्थापनाची कास धरण्याची आवश्यकता.  पुढच्या कालखंडामध्ये व्यवस्थापन विषयक अध्यापनाची निवड केल्यानंतर 1986 साली भरलेल्या, जागतिक अर्थशास्त्र परिषदेमध्ये नोबेल पारितोषिक विजेते डॉ.अमर्त्य कुमार सेन,  तत्कालीन पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ.सुखोमय चक्रवर्ती यांची भाषणे ऐकण्याचा योग मला आला व आर्थिक व्यवस्थापन हा घटक किती महत्त्वाचा  असतो  हे  लक्षात  आले.   परंतु  यशवंतरावांचे द्रष्टेपण हे आहे की, 1980 च्या दशकात महाराष्ट्राच्या खेडोपाडी व्यवस्थापन शिक्षण पोहचले पाहिजे हा कानमंत्र त्यांनी 1976 मध्ये दिला.  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा एक विशेष असा होता की, ते फक्त विचार देऊनच थांबले नाहीत तर मध्यमवर्गातील पदवीधर, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांना त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये संधी मिळवून दिलीच पण त्याच बरोबर सामान्य वर्गातील तरुणांनाही सातत्याने प्रोत्साहन देऊन आधुनिक परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये आणून सोडले.  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेती, उद्योग, सहकार व शिक्षण आदी क्षेत्रातील नेतृत्व हे समाजाच्या अशाच सामान्य थरांतून निर्माण झाले असून, याच लोकांनी विकासाची भव्य-दिव्य मंदिरे उभी केली आहेत. सामान्य माणसांमधील  टॅलेंट ओळखून, ते विकसित करुन समाजाच्या विविध क्षेत्रात सकारात्मक पध्दतीने त्याचा वापर करुन घेणारे यशवंतराव, आधुनिक काळात ज्यालाआपण टॅलेंट मॅनेजमेंट  म्हणतो, त्याचा वापर अत्यंत सहजपणे करत असत, हे लक्षात घेतले पाहिजे.
    यशवंतराव आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक धोरणाचा पाया त्यांनी 1960 च्या दशकात घातला व त्यामध्ये कृषी व औद्योगिक वाढ परस्परांना पूरक व पोषक ठरेल हे सूत्र त्यांनी ठेवले होते. डॉ.धनंजयराव गाडगीळांसारख्या अर्थतज्ज्ञांना बरोबर घेऊन, सहकारी तत्त्वावर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया घातला.  त्यामध्ये कृषी व औद्योगिक क्षेत्रातील समतोल किती महत्त्वाचा असतो हे त्यांनी ओळखले होते.  त्याची आठवण 1986 मध्ये भरलेल्या जागतिक अर्थशास्त्र परिषदेच्या निमित्ताने झाली. कारण कृषी व औद्योगिक क्षेत्रातील समतोल हाच विषय परिषदेसाठी निवडण्यात आला होता. यशवंतरावांनी जी गोष्ट 1960 च्या दशकात ओळखली होती व ज्यासाठी कृषी, औद्योगिक विकासाचे प्रारुप महाराष्ट्रासाठी निवडले होते, त्याची जाणीव 1986 मध्ये जागतिक पातळीवरील अर्थशास्त्रांना झाली. यातच यशवंतरावांची दूरदृष्टी लक्षात येते.
     अर्थात या दूरदृष्टी पाठीमागे फक्त स्वप्नरंजन नव्हते, तर सखोल वाचन व चिंतन यातून निर्माण झालेली वैचारिक बैठक होती हे लक्षात घेतले पाहिजे.  माध्यमिक शाळेतील शिक्षणापासून त्यांना वाचनाचा छंद लागला. मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी पाश्चात्य देशातील श्रेष्ठ ग्रंथकारांचे ग्रंथ वाचून काढले. राज्यकारभार चालवण्यासाठी जशी समाजहिताची प्रेरणा, समाज कल्याणाचा ध्यास महत्त्वाचा आहे, तशीच सखोल वाचन व चिंतनातून निर्माण झालेली वैचारिक बैठक महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन यशवंतरावजींनी 1930 नंतरच्या कालावधीत स्वातंत्र्यासाठी वेळोवेळी घडलेल्या कारावासात प्रदीर्घ वाचन केले होते. कारागृहात असताना त्यांनी जे चौफर वाचन केले.  त्या ग्रंथाची यादी उपलब्ध आहे.  तात्विक राजकारण, सार्वभौमत्वाचे तत्वज्ञान, विविध राष्ट्रांचे इतिहास, विविध ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे-आत्मचरित्रे, कामगार चळवळ, कार्ल मार्क्सचे ग्रंथ, प्रखर राष्ट्रवाद, रशियन क्रान्ती, मानवतावाद याविषयीचे ग्रंथ यांचा समावेश होतो. परंतु याखेरीज भारताचा दारिद्र्याचा प्रश्न, अन्नविषयक धोरण, आरोग्य व शेतीचा प्रश्न याविषयीचे सखोल वाचन देखील यशवंतरावांनी केले होते. जागतिक मंदीचा तो काळ होता. त्यासंदर्भात त्यांनी दि ग्रेट डिप्रेशन या एल रॉबिन्सच्या ग्रंथातील विचारांचा अभ्यास केला.  त्याचबरोबर  इरिगेशन इन इंडिया, ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स  ऑफ इंडिया अशा ग्रंथाचा व अहवालांचा देखील अभ्यास केला.  इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स ऑफ मॉडर्न इंडिया या ग्रंथाचं संपादन त्या काळात डॉ.राधाकमल मुखर्जी यांनी केलं होतं.  यशवंतरावांनी या विषयाचंही  वाचन केलं.
     ही बाब तरुण पिढीच्या दृष्टीने महत्त्वाची होती. एखादा प्रश्न समजावून घेताना त्याविषयीची सखोल माहिती वाचनातून मिळवावी लागते हा संदेश फार महत्त्वाचा आहे.  देशापुढील अनेक आर्थिक प्रश्नांविषयी सोडवणुकीची भूमिका घेताना, यशवंतरावजींना ही वैचारिक बैठक उपयुक्त ठरत होती. यामुळेच यशवंतरावांचा अर्थविषयक मूलभूत दृष्टिकोन हा सर्वांगीण होता. आर्थिक विकासामध्ये सामाजिक प्रेरणा असतात व त्यामध्ये राजकीय प्रश्नही अंतर्भूत असतात. त्यामुळेच  आर्थिक विकास म्हणजे केवळ आर्थिक विकासाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास नव्हे, तर अधिक व्यापक भूमिकेतून त्याचा विचार झाला पाहिजे, असा यशवंतरावांचा आग्रह असे.
     विकासाभिमुख प्रशासनाची महाराष्ट्राला गरज असून, त्यासाठी आर्थिक व्यवस्थापन जाणणारे मनुष्यबळ आवश्यक आहे हे यशवंतरावांनी जाणले होते. म्हणूनच स.गो.बर्वेंसारख्या अर्थतज्ज्ञांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन, प्रगतीशील महाराष्ट्राचा आर्थिक पाया घातला.
    स.गो.बर्वे हे अर्थतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. तत्कालीन कच्छ ते कराची हे कार्यक्षेत्र असणाऱ्या मुंबई विद्यापीठाचे ऑनर्समध्ये आलेले ते एक विद्यार्थी. त्या काळात फक्त चारच विद्यार्थी ऑनर्समध्ये  आले होते. त्यामध्ये स.गो.बर्वे हे एक. माझे वडिलही त्या चार विद्यार्थ्यांपैकी एक असल्यामुळे, स.गो.बर्वे यांच्याबद्दल मला माहिती होती.  यशवंतरावजींनी त्यांना प्रथम अर्थमंत्री व नंतर उद्योगमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समाविष्ट करुन, महाराष्ट्राच्या आथिर्क-औद्योगिक व्यवस्थापनाची घडी घातली व अशा तज्ज्ञ व्यक्तींना निर्णयाचे पुरेसे स्वातंत्र्य दिले. आर्थिक निर्णयामध्ये, त्यातील जाणकारांना पुरेसे स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. ही बाब यशवंतरावजीनी आपल्या कृतींमधून दाखवून दिली. पुढे भारताचे अर्थमंत्री
झाल्यानंतर देखील यशवंतरावांनी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना जे स्थान दिले त्यामुळे निर्णय प्रक्रियेत अधिक व्यावसायिकता आली व विकासाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने ही गोष्ट निश्चितपणे महत्त्वाची ठरली.
     यशवंतरावजींनी महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक धोरणाचा फक्त पायाच घातला नाही तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या संस्थांचे जाळे निर्माण केले. गुणग्राहकवृत्तीने प्रत्येक क्षेत्रातील ‘ˆ¢Ö´Ö’ माणसे हेरली. गुणी माणसांचे, कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण केले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्याची ओळख एक प्रगतीशील राज्य म्हणून निर्माण झाली आहे. आधुनिक व्यवस्थापनामधील ‘योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची ×­Ö¾Ö›’ü हे सूत्र यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थापनाकरिता वापरले.  आधुनिक काळात Good Governance हा परवलीचा शब्द झाला आहे. परंतु भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या यशवंतरावानी त्याचा पाया महाराष्ट्रात एकोणीशे साठ ते सत्तर च्या दशकातच घालून ठेवला होता.  हे कृतज्ञापूर्वक लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात अनेक क्षेत्रात घेतलेल्या पुरोगामी निर्णयांचा स्वीकार कालांतराने देशपातळीवर करण्यात आला व महाराष्ट्राच्या विकासाचे प्रारुप (Model) देशपातळीवर अप्रत्यक्षपणे स्वीकारले गेले.  यामध्ये यशवंतरावांचा द्रष्टेपणा लक्षात येतो.
* डॉ.राजन तुंगारे
 
Top