सोलापूर -: पत्‍नीची बदनामी करणा-या पतीस तीन महिने कॅन्‍सर हॉस्पिटलमधील रूग्‍णांची सेवा करण्‍याची शिक्षा अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश व्‍ही.व्‍ही. पाटील यांनी अपिलात सुनावली.
        अनुपम व राजश्री यांचे लग्‍न 1996 साली झाले होते. त्‍यांच्‍या संसारवेलीवर दोन फुलेही उमलली होती. परंतु पती-पत्‍नीमधील मतभेदांमुळे पत्‍नीने 1999 मध्‍ये बार्शी न्‍यायालयात पतीविरूद्ध घटस्‍फोटाचा दावा दाखल केला होता. 19 डिसेंबर 2002 रोजी या खटल्‍याच्‍या सुनावणीवेळी पतीने याप्रकरणी न्‍यायालयात अर्ज केला की, पत्‍नी राजश्री ही परपुरुषाकडून तीन-चार महिन्‍याची गरोदर आहे व तिची वैद्यकीय तपासणी करण्‍यात यावी. पत्‍नीने स्‍वतःची वैद्यकीय तपासणी करण्‍याची तयारी दर्शविली. तेव्‍हा पतीने पत्‍नीविरूद्ध केलेला अर्ज मार्ग घेतला. पतीने केलेल्‍या अर्जामुळे आपली बदनामी झाली या आरोपाखाली पत्‍नीने बार्शी न्‍यायालयात पतीविरूद्ध फिर्याद दाखल केली. बार्शी न्‍यायालयाने पतीला दोषी धरुन एक महिना साधी कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरूद्ध पतीने सोलापूर जिल्‍हा न्‍यायालयात अँड. धनंजय माने, अँड. जयदीप माने यांच्‍यामार्फत अपील दाखल केले. याची सुनावणी अतिरिक्‍‍त सत्र न्‍यायाधीश पाटील यांच्‍यासमोर झाली.
          पतीने पूर्वग्रहदूषित मनाने रागाच्‍या भरात अर्ज केला होता. परंतु चूक लक्षात येताच त्‍याने अर्ज त्‍याचदिवशी मागे घेतला. अशा परिस्थितीत खालील न्‍यायालयाने दिलेली एक महिना साध्‍या कैदेची शिक्षा भोगण्‍यासाठी पतीला कारागृहात पाठवून काहीही उपयोग नाही, असे मत न्‍यायालयाने व्‍यक्‍त करुन पतीची कारागृहाची शिक्षा रद्द केली व त्‍याची चांगल्‍या वर्तुवणकीच्‍या बॉन्‍डवर मुक्‍तता केली. त्‍याचप्रमाणे आरोपी पतीने तीन महिने बार्शी येथील कै. नर्गिस दत्‍त मेमोरियल कॅन्‍सर हॉस्पिटल येथे रूग्‍णांची सेवा करावी, असे आदेश दिले. याप्रकरणी पत्‍नीकडून अँड. भारत कट्टे, अँड. अजित कट्टे यांनी काम पाहिले.
 
Top