मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या असून, राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा दुरुपयोग टाळावा आणि  नैसर्गिक रंगांचा वापर करुन ‘कोरडी’ रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन केले आहे.
       उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, होळी हा आनंद आणि उत्साहाचा सण. समाजातील दुष्प्रवृत्तींचा विनाश आणि सत्प्रवृत्तींच्या विजयाची जाणीव करुन देणारा हा सण. होळीचा सण उत्साहानं साजरा करीत असताना आपण सर्वांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचं भान राखण्याचीही गरज आहे. त्यामुळे होळीसाठी कुणीही झाडे तोडू नयेत, होळीसाठी उपयोगाच्या लाकडांचा वापर करुन नैसर्गिक साधनसंपत्तीचं नुकसान करु नये. होळी पेटवित असताना केवळ निरुपयोगी आणि टाकावू वस्तूंचाच वापर करावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
        दरवर्षी रासायनिक रंगांमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा होते. काहींना दृष्टी गमवावी लागते. हे धोके लक्षात घेऊन रासायनिक रंगांचा वापर पूर्णपणे टाळण्यात यावा आणि केवळ नैसर्गिक रंगांनीच होळी खेळावी. पाण्याचे फुगे किंवा रंगपंचमीसाठी पाण्याचा वापर यावर्षी पूर्णपणे टाळण्यात यावा, असे आवाहन करतानाच होळी आणि रंगपंचमी सणांच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांमधील स्नेह आणि बंधुत्वाचं नातं अधिक दृढ होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
 
Top