उस्मानाबाद -: जिल्ह्यात यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवत असून त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, नळयोजनांची दुरुस्ती, विंधन विहीरींची दुरुस्ती तसेच नवीन विंधन विहीरी घेणे आणि टॅकरमार्फत पाणीपुरवठा अशा उपाययोजनांद्वारे ही तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न नागरी व ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे. या प्रयत्नांना साथ म्हणून जिल्ह्यातूनच आता मदतीचे शेकडो हात पुढे येऊ लागले आहेत. विविध भागात पाणी साठवणूकीसाठी पाण्यांच्या टाक्यांचे वितरण, वन्यजीवांसाठी असणाऱ्या पाणवठ्यांवर टॅंकरद्वारे पाण्याची व्यवस्था जनावरांसाठी चा-याची व्यवस्था आणि अगदी चारा छावण्या सुरु करण्यासाठीही या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. टंचाईसारख्या आपत्तीला  तोंड देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील संस्थांचा हा पुढाकार म्हणजे मानवता धर्माचे ख-या अर्थाने आचरणच!
        सलग दोन्ही वर्षी पाऊस कमी पडल्याने यंदा जिल्ह्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. उस्मानाबाद व उमरगा शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही तीव्रता अधिक आहे. प्रशासनाने ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध स्त्रोतांचे अधीग्रहण केले आणि हा पाणीसाठा फक्त पिण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, जिल्ह्यातील बहुतांशी साठवण तलाव, सिंचन प्रकल्प कोरडे पडल्याने जेथून पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे असे पर्याय प्रशासनाने आजमावले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या शास्त्रज्ञांकडून भू-भौतिक सर्वे करुन घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात विंधन विहीरी घेण्यात आल्या. काही विंधन विहीरींना पाणी लागले नाही, मात्र काही यशस्वी ठरले. तेथून जवळच्या गावांना, वस्तीला पाणी देण्यात आले. याशिवाय, संबंधित गावांची गरज लक्षात घेऊन तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आल्या. त्यातून त्या गावांची पाणीप्रश्नाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. कोरड्या पडलेल्या प्रकल्पात विहीरी घेऊन उपलब्ध पाणीही वापरात आणले गेले. ज्या शेतक-यांच्या येथे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी व ज्या प्रकल्पात पाणी आहे, अशा ठिकाणाहून पाणी टॅंकरद्वारे आणले जात आहे.
       जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन पाणी पुरवणे या बाबींस सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करीत आहे. उपलब्ध होईल तेथून पाणी आणून ते नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना आता जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, संघटना आणि नागरिकांचाही हातभार लागत आहे. शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना, महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्यासह टाटा सामाजिक व विज्ञान संस्था, भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब, उद्योग संघटना यासह अनेक संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. पैशाच्या स्वरुपात मदत न देता टंचाईग्रस्त गावांना ज्या मदतीची सर्वाधीक गरज आहे, याची माहिती प्रशासनाकडून घेऊन संबंधित गावांमध्ये ती सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय या सामाजिक संस्थांनी घेतला आहे. गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी प्लास्टीकच्या टाक्यांची मोठ्या प्रमाणात  गरज आहे. ही गरज ओळखून या प्रकारच्या टाक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, वन्यजीवांसाठी असणा-या पाणवठ्यांवर पाण्याची व्यवस्था करणे आणि  ग्रामीण भागातील जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी सिमेंटच्या टाक्या  उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. टंचाईची परिस्थिती पाहता सामाजिक संस्थांचा हा पुढाकार निश्चित अभिनंदनीय असून इतरांनाही प्रेरणा देणारा आहे. 
 
Top