नवी दिल्‍ली -: विजेचा वाढता खर्च, प्रदूषण नियंत्रणाच्‍या जाचक अटी, कच्‍च्‍या मालाच्‍या सतत वाढत जाणा-या किती यामुळे वृत्‍तपत्र कागद निर्मितीत घट झाली असून यामुळे वृत्‍तपत्र व्‍यवसाय अडचणीत आला आहे. त्‍यातच भर म्‍हणून जाहिरात उत्‍पन्‍नात अपेक्षित वाढ न होणे आणि वितरण व्‍यवस्‍थेवरचा वाढता खर्च यामुळे वृत्‍तपत्र व्‍यवसायाच्‍या अडचणीत भरच पडली आहे.
    गेल्‍या वर्षभरात रशिया, दक्षिण कोरिया येथील वृत्‍तपत्र कागद निर्मिती करणा-या कंपन्‍यांनी आपल्‍या उत्‍पादनात मोठ्या प्रमाणावर घट केली आहे. दक्षिण कोरियातील जोंजू कंपनीने आपली उत्‍पादन क्षमता साडे सात हजार मेट्रिक टनांनी कमी केली आहे. सरकारने केलेली विजयी भरमसाठ दरवाढ आणि टाकाऊ पदार्थ नियंत्रणासाठी करावा लागणारा मोठा खर्च यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
    उत्‍तर इटलीतील बर्गो या कंपनीने आपल्‍या दोन कंपन्‍यांतील उत्‍पादन क्षमता कमी केली असून वार्षिक दीड लाख टनांनी आपले उत्‍पादन घटविले आहे. नॉरस्‍की या कंपनीने आपल्‍या न्‍यूझीलंड येथील कागद निर्मितीचा प्रकल्‍पच बंद केला आहे. स्‍टोरा इन्‍सो या कंपनीने स्‍वीडनमधील आपल्‍या वृत्‍तपत्र कागद निर्मितीचा कारखाना बंद केला आहे. कोंडापोगा या रशियातील सर्वात मोठ्या वृत्‍तपत्र कागद निर्मिती करणा-या कंपनीने तब्‍बल चाळीस टक्‍के कामगार कपात करण्‍याचा निर्णय घेतला आहे.
    भारतातील बहुतांशी वृत्‍तपत्र कागद तयार करणा-या कंपन्‍या या रिसायकल म्‍हणजेच रद्दीपासून कागद निर्मिती करतात. सध्‍या यातील ब-याच कंपन्‍या या कच्‍चा माल नसल्‍यामुळे बंद पडल्‍या आहेत किंवा प्रिटिंग पेपरकडे वळल्‍यामुळे वृत्‍तपत्र कागद निर्मिती त्‍यांनी बंद केलेली आहे.
    जगभरातील वाढते ई-पेपर वाचक, जाहिरातीच्‍या उत्‍पन्‍नात अपेक्षित न झालेली वाढ, वृत्‍तपत्र निर्मितीसाठी लागणा-या कागदाच्‍या किमतीत दिवसेंदिस होणारी वाढ आणि वृत्‍तपत्राच्‍या किमतीच्‍या तुलनेत वृत्‍तपत्राच्‍या वितरण व्‍यवस्‍थेवर होणारा भरमसाठ खर्च यामुळे एकूणच वृत्‍तपत्र व्‍यवसाय अडचणीत आला आहे. त्‍यातच वृत्‍तपत्रासाठी लागणा-या कागदाच्‍या निर्मितीत वेगाने होणारी घट या व्‍यवसायाला अधिकच अडचणीत आणत असल्‍याचे अभ्‍यासकांचे मत आहे.
    कागदाचा तुटवडा व कागदाच्‍या वाढत्‍या किमती यामुळे जगभरातील वृत्‍तपत्रांनी आपल्‍या किमतीत वाढ केलेली आहे. इंग्‍लंडमध्‍ये लंडन टाईम्‍सची किंमत 1 पौंड म्‍हणजे 75 रूपये आहे. तर अमेरिकेच्‍या न्‍यूयॉर्क टाईम्‍सची किंमती 2.5 डॉलर म्‍हणजे 130 रूपये इतकी आहे. वॉशिग्‍टन पोस्‍ट याची किमत 2 डॉलर म्‍हणजे 108 रूपये इतकी आहे. तर आशिया खंडातील शेजारील पाकिस्‍तान या देशातील डॉन व जंग या दैनिकाची किंमत दररोजची 12 रूपये इतकी आहे. सिलोनमधील सिलान टाईम्‍सची किंमती 10 रूपये आहे. त्‍याचप्रमाणे थायलंड येथील बँकॉक पोस्‍टची किंमत 30 बाथ म्‍हणजे जवळजवळ 44 रूपये इतकी आहे. भारतात देखील पश्चिम महाराष्‍ट्र सोडला तर देशातील सर्व राज्‍यातील सर्व वृत्‍तपत्रांनी किंमत वाढ केलेली आहे. देशातील सर्वात जास्‍त खपाचे असणारे दैनिक जागरण या भाषिक वृत्‍तपत्राने आपल्‍या दररोजच्‍या अंकाची किंमत 5 रूपये आहे. तर देशातील जास्‍त खपार्च भास्‍कर, पंजाब केसरी या दैनिकांनी दररोज चार रूपये किंमत केलेली आहे. बिहार, उत्‍तरप्रदेश, मध्‍यप्रदेश, राज्‍यस्‍थान, आंध्रप्रदेश, गुजरात या सर्व राज्‍यांतील वृत्‍तपत्रांची दररोजच्‍या अंकाची पाने 12/16 असून अंकाची किंमती किमान चार रूपये केलेली आहे.
    विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथील सर्व वृत्‍तपत्रांनी एकत्रितपणे किमान साडे तीन ते चार रूपये किंमत केलेली आहे. पश्चिम महाराष्‍ट्रात देखील पुणे, सोलापूर या ठिकाणी सर्व दैनिकांनी आपल्‍या अंकाची किंमत तीन ते चार रूपये केलेली आहे. दक्षिण महाराष्‍ट्रातील वृत्‍तपत्रांच्‍या किमती अजूनही दोन ते तीन रूपयेच राहिलेल्‍या आहेत. कागदाची घट व वाढत्‍या किंमती यामुळे सर्वच वृत्‍तपत्रांना आता किमान किंमत चार रूपये करण्‍याशिवाय गत्‍यंतर नाही, असे वृत्‍तपत्र अभ्‍यासकांचे मत आहे.   

* साभार दै. पुढारी

 
Top