नळदुर्ग -: भरधाव ट्रक अॅटोरिक्षास ओलांडण्‍याच्‍या प्रयत्‍नात असताना रिक्षावर अचानक ट्रक पलटी होऊन झालेल्‍या भिषण अपघातात दोघे चेंगरुन जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना नळदुर्ग येथील घाटात मंगळवार दि. 26 मार्च रोजी पावणे पाच वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. गंभीर जखमीस सोलापूर येथील रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे.
          याप्रकरणी घटना स्‍थळावरुन मिळालेली माहिती अशी की, महमंद मुस्‍ताक
महमंद जमीर सय्यद (वय 60, रा. गुलबर्गा), यासीर मौला पठाण (वय 25, रा. नळदुर्ग) असे भीषण अपघातातील अॅटोरिक्षामध्‍ये चेंगरुन मरण पावलेल्‍यांची नावे आहेत. तर गौस सय्यद (वय 19, रा. गुलबर्गा) असे गंभीर जखमी झालेल्‍याचे नाव आहे. यातील अॅटोरिक्षा क्रमांक एमएच 04/6349 यामध्‍ये महमंद सय्यद हे आपला मुलगा गौस मुस्‍ताक सय्यद व यासीर पठाण असे तिघेजण नळदुर्ग येथून होर्टी (ता. तुळजापूर) येथे त्‍यांच्‍या मुलीकडे भेटण्‍यासाठी जात असताना नळदुर्ग गावातील घाटातील एका वळणावर राष्‍ट्रीय महामार्गावरील मशीदच्‍या अलीकडे पाठीमागून भरधाव ट्रकने (क्रमांक एपी 16 टी.डब्‍ल्‍यू 3393) रिक्षाला ओलांडण्‍याच्‍या प्रयत्‍नात रस्‍त्‍यावरील खड्डयात जाऊन ट्रक रिक्षावर पलटी झाली. या अपघातात रिक्षामध्‍ये वरील दोघेजण जागीच ठार झाले. तर गौस सय्यद हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्‍कळीत झाली होती. ही घटना समजताच नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर, पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख, महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक जे.एम. तांबोळी, पोकॉ. संजय पवार, श्रीकांत चौधरी, तानाजी झांबरे, सुजित वडणे, गणेश बलसुरे यांच्‍यासह स्‍थानिक नागरिकांनी अपघातग्रस्‍त वाहन बाजूला काढून वाहतुक सुरळीत केली. सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्‍हती. अपघातातील मृतदेहाचे शवविच्‍छेदन करण्‍यासाठी जळकोट येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राकडे पाठविण्‍यात आले होते.
 
Top