उमरगा -: म्‍हैस व बैलासह सोळा शेळ्या वीज पडून जागीच ठार झाल्‍याची विदारक घटना उमरगा व लोहारा तालुक्‍यात मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी सायंकाळी सव्‍वा आठच्‍या दरम्‍यान झालेल्‍या जोरदार वादळी पावसात घडली. तर अनेक ठिकाणी अवेळी झालेल्‍या वादळी गारांच्‍या पावसामुळे फळबागेंचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्‍याचे उघडकीस आले आहे.
    गेल्‍या काही दिवसांपासून सर्वत्र वातावरणामध्‍ये कमालीचा उष्‍मा जाणवत असल्‍याने अंगाची लाहीलाही होऊन नागरीक प्रचंड हैराण होते. ग्रामीण भागामध्‍ये सकाळी दहानंतर ग्रामस्‍थ घरातून बाहेर पडून शेतातील झाडांचा उन्‍हापासून बचाव करण्‍यासाठी आसरा घेत असल्‍याचे चित्र आहे. त्‍यातच मंगळवार दि. 9 एप्रिल रोजी रात्री वादळी वारे होऊन वीजेचा कडकडाटाने पावसास सुरुवात झाली. या अवेळी झालेल्‍या पावसामुळे फळेबागेचे नुकसान झाल्‍याचे वृत्‍त आहे. तर लोहारा तालुक्‍यातील हिप्‍परगा रवा येथे एक बैल, तर उमरगा तालुक्‍यातील भुयार चिंचोली या ठिकाणी 16 शेळ्या, त्‍याचबरोबर तुरोरी येथे एक म्‍हैस वीज पडून ठार झाले. जोरदार पाऊस पडत असल्यामुळे भुयार चिंचोली येथे र्शीमंत बनसोडे व बाबू बनसोडे यांनी आपल्या प्रत्येकी आठ शेळ्या आंब्याच्या झाडाखाली आसर्‍याला बांधल्या. दोघेही जवळच्या गोठय़ात थांबले. यावेळी अचानक झाडावर वीज पडली. यामुळे झाडाखालील शेळ्या ठार झाल्या. तुरोरी येथे गोविंद जाधव यांनी आपली म्हैस शेतातील गोठय़ात बांधली होती. गोठय़ावर वीज पडल्यामुळे म्हैस ठार झाली. लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथील शेतकरी रामदास पंडित जाधव यांनी आपला खिल्लार जातीचा बैल चिंचेच्या झाडाखाली बांधला होता. सायंकाळी 9 वाजता वीज पडल्याने बैल दगावला. याप्रकरणी महसूल विभागाने बुधवारी (दि. 10) पंचनामा केला आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाने शवविच्छेदन केले आहे.
    उमरगा तालुक्यातील एकोंडी (जहागीर) येथे मंगळवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी गारांच्या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. केळी, आंबा, द्राक्ष बागांसह उसाचे फडही आडवे झाले. पावसाने एकोंडी येथील सुनील शिवराज इंगळे यांच्या शेतातील दोन एकर केळीच्या बागेची तर श्रीकांत इंगळे, विनायक इंगळे, संजय इंगळे, अमोल इंगळे, बालाजी इंगळे, गफूर पटेल, यांच्या शेतातील द्राक्ष व आंब्यांची वाताहत झाली. वादळामुळे गावातील सहा घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच तालुक्यातील त्रिकोळी, तुरोरी, दाबका, आष्टा, जकेकूर, कोरेगाव,  परिसरातील गावांतही हिच अवस्था झाली. तुरोरी परिसरातील निजामोद्दिन शेख यांच्या मालकीच्या 3 एकर आंब्याच्या बागेचे नुकसान झाले.
 
Top