नळदुर्ग -: भरधाव खासगी बस राष्‍ट्रीय महामार्गावरील एका अवघड वळणावर पलटी होऊन झालेल्‍या अपघातात दोन वर्षाचा बालक ठार झाला असून 28 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्‍यापैकी दोघा प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात सोलापूर-उमरगा महामार्गावरील केरुर (ता. तुळजापूर) शिवारात असलेल्‍या पाझर तलावाजवळील अवघड वळणावर मध्‍यरात्री साडे बारा वाजण्‍याच्‍या सुमारास घडला.
    आरमान बशीर शेख (वय 2 वर्षे, रा. बोरीवली, मुंबई) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या बालकांचे नाव आहे. यातील सहारा कंपनीची बस (क्रं. केए. 56 / 887) ही हैद्राबादहून प्रवाशी घेऊन मंगळवार रोजी सायंकाळी मुंबईकडे जाण्‍यासाठी निघाली. ही भरधाव बस रात्री नळदुर्ग शहर ओलांडून साडे बारा वाजण्‍याच्‍या सुमारास केरुर (ता. तुळजापूर) गावाच्‍या अलीकडे पाझर तलावाजवळ वळणावर पलटी झाली. त्‍यात वरील बालक मृत्‍यमूखी पडला तर 28 जण जखमी झाले. बहुतांश जखमी मुंबई, पुणे, दिल्‍ली येथील रहिवाशी असल्‍याचे समजते. सर्व जखमींना सोलापूर येथील रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे. पोलिसात बशीर महेबुब शेख (वय 26 वर्षे, रा. बोरीवली, मुंबई) यांनी फिर्याद दिल्‍यावरुन बसचालक महमद म‍कबुल गुडडूसाब (रा. हुमनाबाद) याच्‍याविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर हे करीत आहेत.
 
Top