नळदुर्ग -: खरीप हंगामाच्‍या पेरणीपूर्व बांधावर खतपुरवठा व बियाणे वाटप करण्‍याची मागणी पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे यांनी तुळजापूर तहसिलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    निवेदनात म्‍हटले आहे की, निसर्गाच्‍या अवकृपेमुळे सलग तीन वर्ष शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. यंदा तर खरीप व रब्‍बी हंगाम हातचे जावून बळीराजाला भीषण दुष्‍काळाशी सामना करावा लागत आहे. चोही बाजूने शेतकरी मेटाकुटीस आला असल्‍याने तोंडावर आलेल्‍या खरीप हंगामासाठी त्‍याला आधार देण्‍याची अत्‍यंत गरज आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ पेरणी झाल्‍यानंतर शेतक-यांना झालेला आहे. त्‍यामुळे हे उपयोगी ठरलेले नाही. असा प्रकार न होता दुष्‍काळाची स्थिती समोर ठेवून जूनच्‍या पहिल्‍या आठवड्यापर्यंत शेतक-यांची मागणी नोंदवून मृग बरसल्‍यानंतर त्‍याचे वाटप व्‍हावे, जेणेकरुन या योजनेचा लाभ मिळून शेतकरी वेळेवर पेरणी करेल, म्‍हणून कृषी विभागासह संबंधित खात्‍यानी यंदा सक्षमपणे काम करण्‍यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, दुष्‍काळाशी सामना करणा-या अन्‍नदात्‍याला या योजना पेरणीपूर्व मिळाव्‍यात, सदर योजना प्रत्‍येक सातबाराला मिळावी, अशीही मागणी करण्‍यात आली आहे. निवेदनाची एक प्रत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना पाठविण्‍यात आले आहे.
 
Top