मुंबई -: राज्यात सन 2011 मध्ये अतिवृष्टी, अवेळी पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे 50384.13 हेक्टर शेतपिकांचे व  8692.20 हेक्टर फळपिकांचे क्षेत्र अशा एकूण 59076.33 हेक्टर क्षेत्राचे 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.  त्या क्षेत्रासाठी केंद्र शासनाच्या निकष व दराप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना एक विशेष बाब म्हणून 22 कोटी 52 लाख 56 हजार रुपयांची मदत खताच्या स्वरुपात वाटपाला शासनाने मान्यता दिली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत होणा-या शेतक-यांना केंद्र शासनाच्या निकषांप्रमाणे ववित्त आयोगाच्या शिफारशींनुसार व राज्यशासनाच्या 1983 च्या शासन निर्णयाप्रमाणे मदत दिली जाते.  राज्य शासनाच्या 1983 च्या स्थायी आदेशाप्रमाणे 24 तासात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर अशी बाब नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडते व मदतीस पात्र ठरते.
     अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी केंद्र शासनाच्या अटींना अनुसरुन ही मदत दिली जाईल. शेती पिके व वार्षिक पिकांसाठी कोरडवाहू क्षेत्राला एक हेक्टरच्या मर्यादेप्रमाणे प्रती हेक्टर 3 हजार रु., जलसिंचन क्षेत्राखालील शेतीपिके वा वार्षिक पिकांसाठी प्रती हेक्टर रुपये 6 हजार रु. आणि  मदतीची किमान रक्कम 500 रु. एवढी असेल. फळपिके वा बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर 8 हजार रु. आणि मदतीची किमान रक्कम 1 हजार रु. एवढी असेल.
     कोरडवाहू क्षेत्राखालील नुकसानीसाठी एक हेक्टरच्या मर्यादे प्रमाणे प्रती हेक्टर 3 हजार रु., आश्वासित जलसिंचन क्षेत्राखालील नुकसानीसाठी प्रती हेक्टर 6 हजार रु. प्रमाणे बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टर 8 हजार रु. एवढी मदत असेल.
     हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 201303281555113401 असा आहे.
 
Top