गाई - म्हैशीच्या दूध व विक्री खरेदी दरात वाढ
25 मे पासून दरवाढ लागू - मधुकरराव चव्हाण
मुंबई -: शासकीय दूध योजनेकरिता दुधाचे खरेदी व विक्री दर निश्चित करण्यासाठी सचिव, दुग्धविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या प्रदत्त समितीने राज्यातील शासकीय दूध योजनेमार्फत खरेदी व विक्री करण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गाईच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर रु. 1.50 ने तर म्हैशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर रु.2.50 ने वाढ करण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्यमंत्री गुलाबराव देवकर आणि विभागाचे सचिव अनिल डिग्गीकर उपस्थित होते.25 मे पासून दरवाढ लागू - मधुकरराव चव्हाण
ना. मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले की, या दूध खरेदी दरात वाढ करण्यात आल्यामुळे गाईच्या दूध खरेदी दर प्रति लिटर रु. 17 वरुन रु. 18.50 तर म्हैस दूध खरेदी दर प्रति लिटर रु. 25.00 वरुन 27.50 एवढा करण्यात आला आहे. शासकीय दूध योजनेमार्फत विक्री करण्यात येणा-या गाय/टोण्ड दूध विक्री दरात प्रति लिटर रु. 2 ने वाढ करण्यात येत असून ते आता रु. 29 वरुन रु. 31 इतके होईल. तर म्हैस/फूल क्रिम दुध विक्री दरात प्रति लिटर रु. 3 इतकी वाढ करण्यात आली आहे. ते आता रु. 37 वरुन रु. 40 इतके होईल, असेही ना. चव्हाण यांनी सांगितले. ही दरवाढ दि. 25 मे पासून लागू करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.