बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शीत रक्‍ताच्‍या बदल्‍यात मोठ्याप्रमाणात बक्षीसांचे आमिष दाखवून रक्‍त संकलन केले जात असून त्‍याची परस्‍पर विल्‍हेवाट लावली जाते व त्‍याचा हिशोब दिसून येत नसल्‍याची गंभीर बाब योगेश लोखंडे यांच्‍या तक्रारीनंतर समोर आली आहे.
    सदरच्‍या रक्‍तदान शिबीराचे आयोजित अजित कुंकूलोळ यांनी त्‍यांच्‍या जीवनज्‍योत या संघटनेच्‍यावतीने रक्‍त गोळा केले. त्‍यांनी बेकायदा लकी ड्रॉचे आयोजन करुन अनेक वस्‍तूंची आमिषे रक्‍तदात्‍यांना दाखविले व त्‍याची परस्‍पर विल्‍हेवाट लावली. सदरच्‍या बेकायदा लकी ड्रॉचे वितरण पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार, तत्‍कालीन तहसिलदार दशरथ काळे यांच्‍या उपस्थितीत झाले. सदरच्‍या रक्‍तदान शिबिराचे उदघाटानात तत्‍कालीन पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांची उपस्थिती, त्‍यांच्‍या जाहिराती, लकी ड्रॉचे वितरण होताना घेण्‍यात आलेली छायाचित्रे, वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द झालेल्‍या बातम्‍यांचे कात्रण इत्‍यादी पुरावे सोबत जोडून लोखंडे यांनी चौकशीची व योग्‍य त्‍या कारवाईची तक्रार दाखल केली होती.
    दि. 14 जून 2012 व दि. 18 जुलै 2012 मध्‍ये दिलेल्‍या तक्रारीची सखोल तपासणी व चौकशी केली. त्‍याबाबत महाराष्‍ट्र राज्‍य अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्‍या सह आयुक्‍त (पुणे विभाग) यांच्‍या कार्यालयाकडून लोखंडे यांना उत्‍तर आले. यात सोलापूर विभागाने चौकशी केल्‍याचे तसेच लकी ड्रॉ कायद्याने ठेवता येत नसल्‍याचे अधोरेखित केले. लोखंडे यांच्‍या तक्रारीची दखल घेत राज्‍यातील सर्वच रक्‍तपेढ्यांना अशा प्रकारच्‍या लकी ड्रॉचे आयोजन करण्‍यात येणा-या शिबिरात रक्‍त संकलन करु नये, अशा लेखी सूचना केल्‍याचे म्‍हटले आहे. अजित कुंकूलोळ यांना पदावरुन पदोच्चित करण्‍याची बाब आपल्‍या कार्यालयाच्‍या अधिकारात येत नसल्‍याने त्‍याबाबत इतर विभागाशी संपर्क साधावा असेही म्‍हटले आहे.
 
Top