नळदुर्ग  -: दि. 3 जून रोजी श्री रामतीर्थ येथील 'चारा छावणीत' ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व शेतकरी मेळावा घेण्‍यात येणार असल्‍याची माहिती पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे यांनी दिली.
    नळदुर्गच्‍या रामतीर्थ मंदीर परिसरात राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ व जनकल्‍याण समिती यांच्‍यावतीने जनावरांसाठी चारा छावणी सुरु करण्‍यात आली आहे. या चारा छावणीच्‍या व्‍यवस्‍थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्‍ये चारा छावणीच्‍या ठिकाणी येत्‍या दि. 3 जून रोजी ज्ञानेश्‍वरी पारायण व शेतकरी मेळावा घेण्‍याचे ठरविण्‍यात आले. या चारा छावणीच्‍या व्‍यवस्‍थापन समितीची दर शुक्रवारी आढावा बैठक घेण्‍यात येते. बैठकीत चारा छावणी आणि जनावरांच्‍या आरोग्‍य, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्‍या भेटी, मान्‍यवरांच्‍या भेटी या विषयावर चर्चा झाली. दरम्‍यान, या चारा छावणीमध्‍ये 130 जनावरे दाखल झाली असून त्‍यांना दररोज चारा आणि आठवड्यातून एक वेळेस आरोग्‍य तपासणी केली जाते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप व डॉ. ताकभाते हे जनावरांच्‍या आरोग्‍याची तपासणी करतात. बैठकीला जनकल्‍याण समितीचे आणि चारा छावणी व्‍यवस्‍थापन समितीचे सदस्‍य शिवाजीराव घुगे, दत्‍ता राजमाने, उमाकांत कर्पे, सत्‍तेश्‍वर पाटील, व्‍यंकट महाबोले, ब्रह्माजी भोसले, धोंडीराम पांचाळ, दत्‍ता शेवाळे, बलभिम मुळे, डॉ. सात्विक शहा आदीजण उपस्थित होते. पारायण सोहळ्यास परिसरातील वारकरी आणि शेतकरी बांधवानी मोठ्या संख्‍येनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
 
Top