सोलापूर -: नांदणी सारख्या अत्याधुनिक चेकपोस्टमुळे राज्य शासनाच्या महसूलात निश्चितच वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 
      परिवहन विभाग व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याच्या 22 सीमा तपासणी नाक्यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरण प्रकल्पांतर्गत बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर विकसीत महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील रा.म.क्र. 13, नांदणी येथील सीमा तपासणी नाक्याचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 
      यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर, पशुसंवर्धन दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, महापौर अलका राठोड, आ. दिलीप माने, आ. प्रणिती शिंदे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव डॉ. शैलेश कुमार शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन आयुक्त वी.ना.मोरे उपस्थित होते.
    यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महसूल गोळा करणा-या खात्यांवरती राज्यातील विकास कामे अवलंबून असतात. राज्यात येणा-या काळात नियोजन आयोगाचे 49 हजार कोटी आणि राज्याचे 31 हजार कोटी अशी एकूण 80 हजार कोटींची विकासकामे करण्यात येणार आहेत. परिवहन राज्य रस्ते विकास महामंडळ, विक्रीकर आणि राज्य उत्पादन शुल्क ही सर्व खाती संयुक्तपणे नांदणी सारख्या अत्याधुनिक चेकपोस्टवरती काम करणार आहेत. या अत्याधुनिक चेकपोस्टच्या जाळ्यांमूळे अंतरराज्य वाहतुकीत सुरळीतपणा येऊन राज्याच्या प्रत्येक सीमेवर अतिशय चोखपणे वाहन तपासणीचे कार्य पार पडणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार वाहनामध्ये असेल तर रस्त्यांची खुप मोठ्या प्रमाणात झीज होते याला आता आळा बसणार असून येथे उभारण्यात आलेल्या गोदामामध्ये वाहनांमधला अतिरिक्त भार ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सोईमूळे इतरही फायदे होणार आहेत. या चेकपोस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या वाहनांमध्ये आरएफआयडी पट्टी लावण्यात येईल ज्यामूळे संपूर्ण देशात या वाहनाची ओळख लगेच करता येईल. अशा प्रकारचा अत्याधुनिक चेकपोस्ट उभारणारे महाराष्ट्र हे भारतातील क्रमांक एकचे राज्य असून लवकरच बीओटी तत्वावरील गुणवत्तेचे काम इतर उभारण्यात येणा-या चेकपोस्टमध्ये निश्चित दिसून येईल. व्यापार व औद्योगिकीकरणाच्या वृध्दीसाठी रस्ते वाहतुकीबरोबरच हवाई वाहतुक महत्वाची असल्यामूळे सोलापूर येथील नियोजित बोरामणी विमानतळ केंद्राच्या व राज्याच्या विमानतळ विकास प्राधिकरणाकडे संयुक्तरित्या सोपविण्यात यावे याकरिता मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल व त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
    केंद्रीय गृहमंत्री ना. शिंदे म्हणाले की, सोलापूरच्या सुंदरतेचे प्रतिक ही इमारत असून राज्याला उत्पन्न वाढवून देण्याचे काम येथून होणार आहे.  देशाची संपत्ती वाढविण्याचे काम करामूळे होते. कर आकारणी योग्य पध्दतीने केल्यास देशाचा विकास दर निश्चितच वाढतो. नांदणी चेकपोस्टमुळे महसूल वाढीबरोबरच ज्यांच्या जमीनी या कामासाठी गेल्या आहेत त्या लोकांना प्राधान्याने रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
    सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, अवैध वस्तु वाहतुक, करचोरी यासारख्या गोष्टींना अत्याधुनिक चेकपोस्टमूळे प्रतिबंध बसणार असून वाहतुक नियमांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होऊ शकणार आहे. राज्यातील इतर अत्याधुनिक चेकपोस्टचे प्रकल्प पूर्ण झाल्यावर राज्यात महसूल वाढ होऊन रस्त्यांची झीज थांबून इंधनामध्ये बचत होणार आहे. प्रत्येक चेकपोस्टच्या ठिकाणी 6 स्कॅनर वाहन तपासणीसाठी बसविण्यात आले असून यासर्व चेकपोस्टचे नियंत्रण वांद्रे वरळी सिलींक येथे संगणकाद्वारे होणार आहे. सोलापूरात आयआरडीपीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा 29.97 कि.मी चा टप्पा ही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असेही ते म्हणाले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवहन आयुक्त  शर्मा यशंनी तर आभार प्रदर्शन रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमाळी यांनी केले.
 
Top