बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महिनाभरात दहा ते बारा जणांची फसवणूक करणारा अट्टल 420 रक्‍कम घेऊन हातावर तुरी देत पळून जात आहे. स्‍वतःची वेगवेगळी नावे आणि मोबाईल क्रमांक सांगून आपल्‍या नावाने दुष्‍काळासाठी देण्‍यात येणारे शासकीय अनुदान 1 लाख 25 हजार ते 1 लाख 50 हजार मंजूर झाल्‍याचे सांगत आहे. त्‍याकरीता लाभार्थ्‍योने अनुदानाकरीता 10 ते 15 हजार रक्‍कम शासकीय चलनाद्वारे भरणे आवश्‍यक असल्‍याचे सांगून आपल्‍या नावाने लगेच धनादेश देण्‍यात येणार असल्‍याचा विश्‍वास दाखवून मिळालेली रक्‍कम घेऊन पळून जाण्‍यात यशस्‍वी होत आहे. फसवणूक झालेलेल नागरीक बहुसंख्‍येने ज्‍येष्‍ठ नागरीक आहेत. सदरचा इसम इतका चालाख आहे की ज्‍यांची फसवणूक करणार आहे त्‍यांची इत्‍यंभूत माहिती गोळा करुन एखाद्या भविष्‍यवाल्‍यासारखे पोपटासारखे सांगत तुमची मुलगी या गावात दिली, तुमची जमीन या गावात इतकी आहे, तुम्‍हाला इतकी मुले आहेत, वगैरे माहिती सांगून घरातील नावे सांगून विश्‍वास संपादन करुन हात साफ करण्‍यात यशस्‍वी होत आहे. सदरच्‍या प्रकारानंतर त्‍या व्‍यक्‍तीने पळ काढल्‍यावर आपली फसगत झाल्‍याचे त्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांना लक्षात येत आहे. आपण कसे काय फसलो, याबाबत अनेकांना विश्‍वासच वाटत नाही. मागील महिनाभरापासून अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक होत असल्‍याने पोलिसांनी त्‍याचा मागोवा घेण्‍यास सुरुवात केली आहे. सदरच्‍या इसमाचे छायाचित्र पोलिसांनी मिळविले असून त्‍याचा शोध सुरु आहे. परंतु अशाप्रकारे कोणाची फसवणूक होत असताना नागरिकांनी अक्‍कल हुशारीने वागून पोलिसांशी संपर्क साधवा, पोलीस काही वेळातच त्‍या ठिकाणी हजर होतील, असे आवाहन बार्शी पोलिसांनी केले आहे.
 
Top