रविराज कोकाटे
कळंब (भिकाजी जाधव) -: देवदर्शन करुन नवरी व नवरदेव दुचाकीवरुन गावाकडे परतत असताना एसटी बसची जोरदार धडक बसून झालेल्‍या अपघातात नवरदेव जागीच ठार तर नवरी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना वडगाव (ता. उस्‍मानाबाद) पाटीजवळ आज शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता घडली. 'भातुकलीच्‍या खेळामधली राजा आणि राणी, अर्धावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी' या गीताप्रमाणे अंगावरची हळद निघण्‍यापूर्वीच नवरदेवाचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याने परिसरात हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे.
    रविराज दत्‍तू कोकाटे (वय 25 वर्षे, रा. ढोकी, ता.जि.उस्‍मानाबाद) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या नवरदेवाचे नाव आहे. तर शैला रविराज कोकाटे (वय 21 वर्षे) असे गंभीर जखमी झालेल्‍या नवरीचे नाव आहे. रविराज व शैला यांचा विवाह अवघ्‍या चार दिवसापूर्वी म्‍हणजे दि. 20 मे रोजी मोठ्या थाटामाटाने झाला होता. कोकाटे नवदाम्‍पत्‍य येरमाळा येथील येडेश्‍वरी देवीचे दर्शन घेण्‍यासाठी ढोकी येथून शुक्रवार दि. 24 मे रोजी गेले होते. येडेश्‍वरी देवीचे दर्शन घेऊन गावाकडे मोटारसायकल क्रमांक एम.एच. 25 एस. 3097 यावर स्‍वार होवून परतत असताना वडगाव पाटीजवळ दुपारी एक वाजता तुळजापूर-नाशिक एसटी बसची (क्रं. एम.एच. 40 एन. 9743) व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात नवरदेव रविराज यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर शैला हिच्‍या डोक्‍याला दुखापत झाल्‍याने गंभीर जखमी झाली. त्‍यास पुढील उपचारासाठी उस्‍मानाबाद येथील जिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. अंगावरची हळद सुकण्‍यापूर्वीच व भावी संसाराबदल पाहिलेले स्‍वप्‍न या अपघातामुळे आधुरे राहिले, अशा त-हेने रविवराजचा मृत्‍यू झाल्‍याने ढोकी गावासह व परिसरात शोककळा पसरली.
 
Top