बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- मागासवर्गीयांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून देण्‍यात येणा-या जमीनीचे वाटप होत नसल्‍याने तसेच घरकुल योजनेसाठी आणखी पन्‍नास हजारांची रक्‍कम आकारावी, यासाठी मंगळवार दि. 7 मे रोजी 51 जण उपोषणास बसणार असल्‍याची माहिती अन्‍याय विरोधी आंदोलनचे अध्‍यक्ष नवनाथ चांदणे यांनी दिली.
    सोलापूर जिल्‍ह्यात 65 हजार एकर जमीन पडीक असताना आजपर्यंत केवळ 136 एकर जमिनीचे वाटप करण्‍यात आले. समाजकल्‍याण विभागाकडून व्‍यवस्थित काम होत नाही. शासनाच्‍या क्रांतीवीर लहूजी वस्‍ताद साळवे या समाज कल्‍याणासाठी नेमलेल्‍या आयोगाच्‍या 85 पैकी केवळ 56 शिफारसी स्विकारण्‍यात आल्‍या. कॅबिनेट मिटींगमध्‍ये मंजूर झालेल्‍या प्रत्‍येकी अडीच एकर शेत जमीनी देण्‍याच्‍या योजनेची अंमलबजावणी होत नाही. समाजकल्‍याण अधिकारी याबाबत जमीनदार आपल्‍या जमिनी शासकीय दरात विकत नसल्‍याने कारवाई होत नसल्‍याचे सांगत आहेत. यावर अन्‍याय विरोधी आंदोलन यांनी शेतक-यांच्‍या जमिनी ऐवजी पडीक जमीन, गायरान व शेतक-यांची अतिक्रमण केलेल्‍या जमीनी लॉटरी पध्‍दतीने वाटप करण्‍यात याव्‍यात, अशी मागणी केली आहे. सदरची मागणी मान्‍य होईपर्यंत बार्शी येथे उपोषण करण्‍यात येत असल्‍याचेही संबंधित अधिका-यांच्‍या लेखीन पत्राद्वारे कळविण्‍यात आले आहे.
 
Top