सोलापूर -: जिल्हयाला कृषी वैभव प्राप्त करुन देण्यासाठी कृषी विभागाच्या अधिका-यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती जालींदरभाऊ लांडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. दाभाडे, जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळळी आदींची प्रमुख  उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, कमी पाण्यावर, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी पिके कोणती याबाबत कृषी विभागांनी प्रभावी जनजागृती करुन शेतक-यांना मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे भूजलाच्या  पाण्याचे व्यवस्थापन, पुनर्भरण याबाबत शेतक-यांनी माहिती दयावी. याबाबतचे फलक तयार करुन तालुकास्तरावरच्या प्रमुख भाजीपाल्याच्या बाजाराच्या ठिकाणी व सद्या जनावरांच्या छावणीच्या ठिकाणी लावावेत असे आवाहन केले. त्याचप्रमाणे कमी पाण्यावर येणा-या पिकांबाबत शेतक-यांना माहिती होण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर दोन मोठे मेळावे घेऊन मार्गदर्शन करावे. महिला शेतक-यांचे मेळावे घेण्याचे पालकमंत्र्यांनी सुचित केले.
    तसेच पाण्याचा अनिर्बंध वापर थांबविण्यासाठी ड्रीपचा वापर करण्यासाठी शेतक-यांच्या  बांधावर जावून प्रबोधन करावे. त्याचप्रमाणे बांधावर एमआरईजीएस अंतर्गत वृक्ष लागवड करावी. मजुरांना जास्तीत जास्त कामे देण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन केले.
    यावेळी पालकमंत्री ढोबळे यांनी मागील वर्षी किती क्षेत्राचा पिकविमा उतरवीला, किती रक्कम अदा झाली आदी बाबत माहिती घेतली. तसेच नव्याने घेण्यात आलेल्या किती विहिरींना पाणी लागले, पाणी असलेल्या किती विहिरींना वीज कनेक्शन मिळाले नाही याची यादी देण्यात यावी. ज्यांना वीज कनेक्शन मिळाले नाही त्यांना देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
 
Top