नळदुर्ग -: किलज (ता.तुळजापूर) या टंचाईग्रस्‍त गावात पाण्याच्‍या टँकरमधून पाणी भरताना एका 14 वर्षीय मुलाचा टँकरखाली सापडून जागीच ठार झाला. या गावात पाण्‍याचे टँकर आलेले पाहून मुले, मुली, महिला, पुरुष यांची एकच झुंबड उडते. घागरभर पाणी भरत असताना चालकाने टँकर अचानक मागे घेतल्याने नववीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा टायरखाली चिरडून करुण अंत झाला. घोटभर पाण्‍याने घेतला एका मुलाचा जीव असे ग्रामस्‍थातून हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे. दरम्‍यान अपघातानंतर टँकरचालक फरार झाला आहे.
    नितीन सोनाजी गवळी (वय 14 वर्षे, रा. किलज, ता. तुळजापूर) असे मरण पावलेल्‍या मुलाचे नाव आहे. पाण्याच्या सोयीसाठी किलज (ता. तुळजापूर) या गावात १0 ऑगस्ट २0१२ पासून एक तर ३0 जानेवारी पासून दोन टँकर प्रशासनाने सुरु केले आहेत. दोन टँकेरद्वारे पाणीपुरवठा केला जात असतानाही पाणी नियमित मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.मुबलक पाणी मिळत नसल्यानेच थोडेसे जास्त पाणी मिळविण्यासाठी टँकर आलेला पाहून शालेय विद्यार्थी व गावातील तरुण त्यावर चढून पाणी घेण्याचा प्रयत्न करतात. नितीन सोनाजी गवळी (वय १४) हा टँकरच्या (क्र. एम.एच. १३ बी. ४६९९) टायरवर चढून पाणी मिळविण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी अचानक चालकाने कसलीही सूचना न देता टँकर पाठीमागे घेतल्याने नितीन गवळी हा खाली पडून त्याच्या डोक्यावरुन चाक गेल्याने तो जागीच ठार झाल्याची फिर्याद विनायक तुकाराम गवळी यांनी दिली आहे. त्यावरुन टँकरचालकाविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोउपनि मुबारक शेख हे करीत आहेत. दरम्यान अपघातानंतर टँकरचालक फरार झाला आहे.
 
Top