उस्मानाबाद :- राज्याची तिजोरी रिकामी झाली तर चालेल, पण दुष्काळ निवारणासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे राज्य सरकारचे धोरण असल्यामुळे शासनाने दुष्काळावर यशस्वीरित्या मात केली आहे.विरोधकांनी टीका ही केवळ विरोधासाठी आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
    भूम तालुक्यातील हांडोग्री गावाजवळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील- हांडोग्रीकर यांनी जनावरांसाठी गेल्या साडेतीन महिन्यापासून चारा छावणी सुरू केली आहे. या ठिकाणी सध्या सात हजार जनावरे असून, जिल्ह्यातील सर्वात चांगली चारा छावणी म्हणून ओळखली जात आहे.या छावनीस सोमवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भेट देवून समाधान व्यक्त केले .त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. 
        यावेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री आ.बसवराज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, माजी अध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे, संघटक राजेंद्र शेरखाने, विनोद गपाट, बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर, आण्णासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.
     यंदाचा पावसाळा लवकर सुरू व्हावा, पण जरी पावसाळा लांबला तरी शासन दुष्काळ निवारण करण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही.पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, मागेल त्याला काम, हे शासनाचे धोरण असून, त्यात कसलीही कुचराई होणार नाही, असेही माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
      भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी, शासन दुष्काळ निवारण निधी वाटप करताना, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला होता, त्या आरोपाचे खंडण करताना माणिकराव ठाकरे यांनी फडणवीस हे विरोधक असल्याने केवळ विरोधासाठी विरोध करतात.त्यांना शासनाचे काहीच चांगले दिसत नाही.हांडोग्रीच्या चारा छावणीस त्यांनी भेट दिली असती तर त्यांचे मत कदाचित बदलले असते, असा टोला मारला.
      हांडोग्रीच्या चारा छावणीस शासनाचे अनुदान दिले जाते, याठिकाणी काँग्रेसचे झेंडे लावणे गैर नव्हे का, यावर ते म्हणाले की, शासन काँग्रेसचे आहे.मी काँग्रेसचा आहे, काँग्रेस कार्यकत्‍यांने छावणी सुरू केली आहे. माझे स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे झेंडे लागले असले तरी, त्यात काहीही गैर नाही, असा खुलासा केला. एलबीटीच्या बाबतीत मुख्यमंत्री व्यापा-यांशी चर्चा करूनच निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
      हांडोग्रीची चारा छावणी दुष्काळग्रस्त भागातील सर्वात आदर्श छावणी आहे, याठिकाणी दुधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे, छावणीचालक बाळासाहेब पाटील- डोग्रीकर यांचा काँग्रेस पक्ष योग्य ती दखल घेतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.बाळासाहेबांनी जनावरांसाठी सुरू केलेली छावणी केवळ अनुदानासाठी नसून मानवी दृष्टीकोणातून त्यांनी सुरू केल्याचे गौरवोद्गारही ठाकरे यांनी यावेळी काढले.
 
Top