बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्‍या उत्‍सवमूर्तीची चोरी झाल्‍याने संपूर्ण महाराष्‍ट्रात खळबळ निर्माण झाली होती. तत्‍कालीन पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांनी यातील गुन्‍हेगारांचा शोध येत बार्शी न्‍यायालयासमोर हजर केले. अखेर त्‍यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्‍यात आली.
    यातील गुन्‍हेगार अविनाश कसबे याने मूर्ती चोरुन असर सय्यद, खुर्शिदा सय्यद, समर सय्यद (सर्वजण रा. मंगळवार पेठ, बार्शी) यांना विकल्‍याचे तपासात निष्‍पण्‍ण झाले. यातील कसबे यास सहा महिने कारावास तर तिघा सय्यद यांना एक महिना कारावास व तीन हजार दंडाची शिक्षा ठोठावण्‍यात आली.
    सदरच्‍या घटनेत दि. 25 ऑक्‍टोबर 2008 रोजी मूर्तीचे मानकरी प्रदीप शेटे यांच्‍या घरातून श्री भगवंताची पंचधातूची मूर्ती चोरीला गेली होती. पोलीस निरीक्षक सावंत यांनी केलेल्‍या कसून तपासात यातील आरोपींना अटक करण्‍यात आली. सुभाषनगर येथील गावतळ्यात मूर्तीचे तुकडे करुन नंतर पाण्‍यात टाकल्‍याचे तपासात दिसून आले होते.
    सदरची मूर्ती ही पुरातन काळातील असल्‍याने यामध्‍ये सोन्‍याचा वापर असल्‍याचा समज चोरट्यांचा झाल्‍याने याची चोरी झाली होती. याचे मानकरी शेटे हे देखील सोन्‍याचे व्‍यापारी होते. त्‍यामुळे सदरच्‍या मुर्तीबाबत अनेक चर्चेला त्‍यावेळी उधाण आले होते. यामध्‍ये आणखी काही आरोपी होते का व हे कोणीतरी करायला लावले का अशा अनेक चर्चेनंतर तपास कामात मूर्तीचा शोध लागल्‍याने सर्व चर्चा बंद झाल्‍या. सदरच्‍या प्रकारानंतर पंच कमिटीने त्‍वरील दुसरी उत्‍सवमूर्ती तयार करुन भाविकांच्‍या श्रद्धांचा मान ठेवला. सरकारी वकील श्रीमती बळी यांनी यातील कामकाज पाहिले.
 
Top