सोमवार दि.13 मे रोजी बसवेश्वरांची 908 वी जयंती कर्नाटक व महाराष्ट्रासह देशभर साजरी होत आहे. वीरशैव गुरु महात्मा बसवेश्वर यांचा इ.स.1131 ते 1167 पर्यंतचा कार्यकाल आहे. कर्नाटक व महाराष्ट्रात वास्तव्य करणा-या या महापुरुषांनी कधीही पदाचा मोह ठेवला नाही आणि आपल्या तत्वाशी तडजोड कधीही केली नाही. त्यांनी समाज परिवर्तनवादी विचारांची पताका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात बिंबविन्याचे कार्य केले. त्यांच्या प्रबोधनवादी विचाराची आज समाजाला गरज आहे.
     महात्मा बसवेश्वर हे मध्ययुगातील भारताच्या धार्मीक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, व राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते. समाज -सुधारकांच्या यादीतही यांचे पहिले स्थान आहे म्हणूनच त्यांना आद्य भारतीय समाजसुधारक, क्रांतीयोगी   व युगपुरुष  मानले जाते.
    छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच महात्मा बसवेश्वर हे कृतीशील क्रांतीकारक होते. देवालयापेक्षा देहालयाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करणारा मध्यमयुगातील सर्वश्रेष्ठ संत म्हणून महात्मा बसवेश्वराकडे पाहिले जाते. यांच्यासारखा महापुरुष जगाच्या पलिकडे पहावयास मिळणार नाही. त्यांनी दिलेल्या तत्वामध्ये प्रामुख्याने प्रमाणिकपणे धनसंपत्ती कमविणे, जास्तीची संपत्ती गुरु, लिंग व जंगम यांच्या सेवेसाठी खर्च करावे, अशी त्यांची धारणा होती.
    महात्मा बसवेश्वर यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावी सन 1105 मध्ये सुप्रतिष्ठित ब्राम्हण समाजात त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव मादरस तरआईचे नाव मादलांबा हे होते. त्यांचे वडील विज्ञान पंडीत होते. वयाच्या 8 व्यावर्षी मुंजीची तयारी झाल्यावर मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे, असे म्हणून बसवेश्वरांनी मुंज करुन घेण्याचे नाकारले होते. ज्ञानप्राप्तीच्या शोधासाठी त्यांनी घराचा त्याग केला. कृष्णा आणि तिची उपनदी मलप्रभा यांच्या संगमावर वसलेले कुंडलसंगम येथे  ते गेले. कुंडलसंगमचे कुलपती जातवेदमुनी (ईशान्यगुरु) यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे बारा वर्षे वेगवेगळया भाषा, धर्म, तत्वज्ञान, वेद-वेदांतांचे अध्ययन केले. ते नंतर कुंडलसंगम सोडून कल्याण येथे गेले. त्यांनी समाजसेवेच्या प्रचारासाठी लिंगायत धर्माची पंचाचार्याकडून ईष्ट लिंग दीक्षा घेतल्यामुळेच वीरशैव हे नाव प्राप्त झाले. त्यांचे मामा बलदेव यांची मुलगी गंगाबिकेशी जातवेदमुनींच्या आग्रहामुळे कल्याण येथे त्यांचा विवाह झाला. 
   महात्मा बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे लिपीक पासून कामाची सुरुवात केली. राजा बिज्जलाला सापडलेल्या ताम्रपटावरील लिपीचे वाचन दरबारात कोणासही जमले नाही, ते वाचन बसवेश्वरांनी केले. त्याची बुध्दीमता पाहून बलदेवाच्या मृत्यूनंतर बसवेश्वरांना कोषाधिकारी बनविले. त्यांच्या पदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या व प्रजेच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेऊन राज्याचे, प्रजेचे कल्याण केले. कल्याण व मंगळवेढा ही स्वतंत्र राज्य होती. कल्याणचे राजे बिज्जल राजाने महात्मा बसवेश्वरांना मंगळवेढयाहून कल्याण राजधानीकडे पाचारण केले. कल्याण राज्याचे ते 1167 पर्यंत पंतप्रधान होते.
     जसे महाराष्ट्रातील संतांनी कार्य केले ते महात्मा बसवेश्वरांनी कर्नाटकात केले. महात्मा बसवेश्वर यांचे व्यक्तिमत्व चांगले असल्यामुळे नागरिकांनी त्यांना महात्मा पद बहाल केले. सन 1132-1153 अशी 21 वर्षे मंगळवेढा येथे यशस्वी कामे केली, म्हणून मंगळवेढा येथे नागरिकांची बसवेश्वरांना महात्मा ही पदवी मिळण्यासाठी मोलाची साथ लाभली. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव इतिहासात करावा लागेल. त्यांचे कार्य व शिकवण ही,गौतम बुध्द व भगवान महावीर यांच्या बरोबरीने अशीच आहे. ते संत होते त्यांची संस्कृती आणि धर्म सुधारणेचा दर्जा वाढविण्यास बसवेश्वर प्रमुख होते.
     महात्मा बसवेश्वर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. तत्वज्ञ, कुशल प्रशासक, त्यांचा सामाजिक समतेवर विश्वास होता. त्यांनी पुरुष-स्त्री भेदभाव, उन्नती, हक्क, जातीभेद, सामुदायिक विवाह, समाजात अस्पृश्यता, प्रत्येकाला  विचार स्वातंव्य, सर्वागीण विकास क्षेत्रात उन्नती  याचा अंगीकार केला होता. त्यांचा बालविवाहास विरोध होता आणि विधवांच्या पुनर्विवाहाला त्यांनी मान्यता दिली. समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ब्राम्हण मधुवरसाची मुलगी व अस्पृश्य मानल्या गेलेल्या हराळय्याचा मुलगा यांचा त्यांनी विवाह लावून दिला. तो विवाह देशातील पहिला आंतरजातीय विवाह ठरला आहे. कर्मठ परंपरेला नाकारणारे विज्ञानवादी, समतावादी महान तत्ववेत्ते आणि 12 व्या शतकातील बुध्द म्हणून सुध्दा बसवेश्वरांना ओळखले जाते. 
     महात्मा बसवेश्वरांच्या उदयापूर्वी कर्नाटकात हिंदू,जैन, बौध्द धर्म व कापालिक,कालामुख,शाक्त इत्यादी पंथ होते. या पार्श्वभूमीवर बसवेश्वरांनी शिव हा एकमेव ईश्वर असल्याची घोषणा केली. बसवेश्वरांनी वीरशैव या नावाने संप्रदाय पुनरुज्जीवीत व संघटीत करुन धर्मसुधारणेचे कार्य केले. 
महात्मा बसवेश्वर हे शिवाची भक्ती करत असत. इष्टलिंग हे आपल्या अंत:करणातल्या निर्गुण निराकार शिवाचे प्रतीक आहे. इष्टलिंग पूजा म्हणजेच शिवाची उपासना नसून इष्टलिंगाच्या पुजेबरोबरच माणुसकी, दया, क्षमा, शांती, समता, सत्य, करुणा, शील आणि सौजन्य आदि सद्गुण आचारणात आणले तर तरच शिवाची पूजा होईल, असे ते म्हणत. श्रम हाच खरा स्वर्ग हे त्याचे प्रसिध्द वचन होते. मानवी उन्नतीचा मार्ग श्रम होय, ही धारणा समाजाच्या गळी उतरविण्याचे कार्य बसवेश्वरांनी केले.
     गळयात रुद्राक्ष,चांदीचे लिंग आणि कपाळी भस्म धारण करतो तो वीरशैव होतो,असे त्यांची विचारधारा होती. महात्मा बसवेश्वर हे शिवभक्त होते. त्यांचे ठाम मत होते की, जंगमभक्ती अर्थात समाजसेवा केल्याशिवाय, तन,मन,धन अर्पण केल्याशिवाय केवळ लिंग भक्ती करणे निरर्थक आहे. बसवप्रज्ञा म्हणजे जातिभेद, लिंगभेद, वर्गभेद आणि कुळभेद हे सारे मिटवणे व मानव धर्माचा स्विकार करणे, अन्यायविरुध्द आवाज बुलंद करणे, अहंकाराचा नाश करणे ही त्यांची प्रतिज्ञा होती.
    महात्मा बसवेश्वारांचे महान कार्य म्हणजे वाड :मयाची निर्मिती होय. त्यांच्यातील स्वातंत्र्य, समता अणि बंधुता ही प्रमख तत्वे होते. त्यांनी सर्वांपेक्षा मानवतावादी आणि समता व सर्वसमभावाने युक्त असा धर्म बनविला.
    बाराव्या शतकात सर्व जातीवर्णातील स्त्री पुरुषांसाठी वैचारिक आदान-प्रदानासाठी  कल्याण येथे अनुभव मंटप या नावाचे सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण केले होते. ते त्या काळातील मुक्त विद्यापीठ होते. यात सर्वांना प्रवेश होता. सातशे पुरुष व सत्याहत्तर स्त्रिया सभासद झाल्या होत्या. यामध्ये कसलाही भेदभाव करत नसत. बसवेश्वरांनी स्त्रियांना लिंग दीक्षेचा पुरुषाप्रमाणेच अधिकार दिला. त्यामुळे स्त्रियांना धार्मीक स्वातंत्र्य बहाल झाले. त्यामुळेच तर स्त्री-पुरुष एकत्र बसून चर्चा करता येऊ लागली. त्यांनी भारतीय महिलांना संघटित करुन साक्षर केले. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही दिले.
    बसवेश्वर हे गरीबांचे कैवारी होते. आपली संपती लोकसेवेसाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरविले होते. ते नेहमी दलित वस्तीमध्ये जाऊन त्या लोकांच्या अडी-अडीचणी जाणून घेत. त्यावेळी दलितांनी बसवण्णांच्या लिंगायत चळवळीच्या झेडयाखाली एकत्र येऊन लिंगदीक्षा घेतली होती. त्यांचा भर अस्पृश्यता नष्ट करण्यावर होता.
    महात्मा बसवेश्वरांचा लिंगायत धर्म  प्रामुख्याने दलित संवेदनेवर आणि मानव जातीच्या तत्वावर  आहे. आजही या धर्मात विविध जातींचा समावेश आहे. समता हे तत्व त्यांच्या धर्म प्रसाराचे प्रमुख सूत्र आहे. बसवण्णांनी हा बंधुभाव धर्मात कायम ठेवला. आपण जे कमवतो त्यात ईश्वरांचा वाटा आहे. म्हणून त्यातील दीन दु:खीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे. यावर त्यांनी भर दिला होता. जन्माने ब्राम्हणत्व नाकारुन त्यांनी लिंगायत धर्माला नव संजिवनी प्रदान केली.
    बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी सुरु केलेले कार्य निश्चितच क्रातीकारक होते. आपले जीवितकार्य असे पूर्ण झाले आहे. ज्या कुंडलसंगमामुळे आपण ईश्वरी इच्छाशक्तीचे साधन बनलो त्या कुंडलसंगमाकडे गेले पाहिजे, असे त्यांना वाटले. इ.स.1167 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी ते संगमेश्वराशी एकरुप झाले. कल्याण क्रांतीतील शरण हुतात्मे कूडलसंगम येथे समाधी (कर्नाटक) स्थळ आहे. महात्मा बसवेश्वरांच्या समाजवादी विचारांची समीक्षा करुन विचार आत्मसात केले तरच त्यांची  खरी जयंती साजरी होईल, असे वाटते.

 -  अशोक रामलिंग माळगे,
         उस्मानाबाद
 
Top