बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कांदलगाव (ता. बार्शी) येथील ग्रामदैवत श्री नरसिंहाचे जयंती हजारो भाविकांच्‍या उपस्थितीत नरहर महाराज की जय च्‍या जयघोषात उत्‍साहात पार पडली.
    जयंतीच्‍या निमित्‍ताने गावातील मानकरी रामचंद्र नवले यांच्‍या घरापासून श्री नरसिंहाच्‍या मुर्तीची गावात पायघड्या अंथरुन, लेझीम, ढोल, ताशाच्‍या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्‍यात आली. तर सायंकाळी सुर्यास्‍ताच्‍या वेळी पंचक्रोशातील हजारो भाविकांच्‍या उपस्थितीत जयंतीच्‍या मुख्‍य सोहळा गुलालाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक नरसिंह भक्‍तांनी केळी व फराळाचे वाटप केले. रात्री नऊ वाजता अँड. जयवंत बोधले महाराज यांचे किर्तन संपन्‍न झाले. यामध्‍ये महाराजांनी भक्‍ताचे महत्‍व विशद करताना फक्‍त प्रल्‍हादासाठी नृसिंहाने अवतार धारण करुन हिरण्‍यकश्‍यपुचा वध केला असे सांगितले. तर खरा वारकरी व भक्‍त कोणता, सत्‍य आणि चांगले काय आहे. याविषयी सविस्‍तर विवेचन केले. या किर्तनानंतर पाचपिंपळा, उंडे गाव, सिरगाव, कांदलगाव, जवळा, बोधराज भजनी मंडळ बार्शी यांचा जागर झाला. तर पहाटे देवस्‍थान समितीच्‍यावतीने अभिषेक घालण्‍यात आला.
    तर सकाळी गिते बाबा मठाचे ह.भ.प. महालिंग महाराज पंढरपूरकर यांचे काल्‍याचे किर्तन झाल्‍यानंतर गावक-यांच्‍यावतीने महाप्रसाद देण्‍यात आला. रात्री सात वाजता प्रथेप्रमाणे नरसिंह मंदिरात शेरणी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तर रात्री पालखी (छबीना) मिरवणूक काढण्‍यात आला. यामध्‍ये दर्शन घेण्‍यासाठी गावक-यांनी मोठी गर्दी केली होती.

 
Top