नळदुर्ग -: तुळजापूर तालुक्‍यातील लोहगाव येथे मोठ्याप्रमाणात पाण्‍याची समस्‍या निर्माण झाली आहे. केवळ ग्रामपंचायतीच्‍या नियोजनाअभावी नागरिकांना पाणी समस्‍येला तोंड द्यावे लागत आहे. दरम्‍यान, दररोज नागरीक पाण्‍यासाठी पाण्‍याच्‍या टाकीजवळ पाण्‍याची वाट घागरीच्‍या रांगा लावून बसलेले दिसत आहेत.
    लोहगाव (ता. तुळजापूर) हे गाव जवळपास तीन हजार लोकवस्‍तीचे गाव आहे. शासनाने सध्‍या या ठिकाणी एक पाण्‍याच्‍या टँकर दिला असून या पाण्‍याच्‍या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यापुर्वी या गावाला खंडाळा मध्‍यम प्रकल्‍पामधून पाणीपुरवठा होत होता. मात्र सध्‍या हे धरण पूर्णपणे कोरडे पडले आहे. धरण कोरडे पडण्‍याची ही पहिलीच वेळ असल्‍याचे ग्रामस्‍थ सांगत आहेत. धरणाच्‍या पायथ्‍याशी सांडव्‍याच्‍या खालच्‍या बाजूस ग्रामपंचायतीच्‍या दोन विंधन विहीरी होत्‍या. त्‍याही बंद पडल्‍यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्‍या या गावातील नागरीक रात्रीच्‍यावेळी पाच किलोमीटर अंतरावरुन रात्रभर पाणी भरण्‍यासाठी जागरण करावे लागत आहे. घागरभर पाण्‍यासाठी नागरिकांची होणारी फरफटही शासनाने दूर करण्‍याचा प्रयत्‍न केला असला तरी एका टँकरने गावाला पाणीपुरवठा होणे कठीण झाले आहे. या टँकरमधून नागरिकांना पाणी मिळतेच असे नाही म्‍ळणून नागरीक टँकरची वाट न पाहता ते पाच किलोमीटरवरुन पाणी आणत आहेत. सध्‍या टँकरने गावातील दोन विंधन विहीरीमध्‍ये आणि तीन ठिकाणी ग्रामपंचायतीने बांधलेल्‍या पाण्‍याच्‍या टाकीमध्‍ये पाणी टाकून तोट्याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्‍यामुळे सध्‍या गावातील नागरीक पाण्‍याच्‍या टाकीवर पाण्‍यासाठी दिवसभर पाण्‍याच्‍या घागरी लावून बसतात.
    दरम्‍यान, महावितरणकडून मोठ्याप्रमाणात वीजेचे भारनियमन केले जात आहे. आठ तासातून दोन तास वीज गाय होत असल्‍याने टँकरमध्‍ये पाणी भरण्‍यास वेळ होत आहे. त्‍यामुळे या भारनियमाचा पाणीपुरवठ्यावर फटका बसत आहे. महावितरणकडून शेतातील शेतक-यांच्‍या वीजपंपाची भारनियमन कमी करुन दहा ते बारा तास वीज पुरवठा चालू करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्‍यान, विजेच्‍या केल्‍या जाणा-या भारनियमनामुळे टँकरलाही पाणी मिळत नसल्‍याची काही नागरिकांची तक्रार आहे. त्‍याच रात्रीचा वीजपुरवठा करण्‍यापेक्षा दिवसा वीज पंपाचा वीजपुरवठा चालू ठेवल्‍यास पाणीपुरठ्याची काही प्रमाणात समस्‍या सूटू शकेल.
    दरम्‍यान ग्रामपंचायतीच्‍या पदाधिका-याचे नियोजन नसल्‍याने गावात मोठ्याप्रमाणात पाणीटंचाई झाली आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्‍य प्रशांत देशमुख यांनी बोलताना दिली. तर ग्रामपंचायतीचे उपसरपंच भिवाजी इंगोले म्‍हणाले की, महावितरणकडून सतत वीजुरवठा गायब केला जातो. त्‍यामुळे वीजपंपावरुन टँकरमध्‍ये पाणी भरण्‍यास वेळ लागत आहे, म्‍हणून गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एका टँकरने गावात पाणीपुरवठा होवू शकतो. मात्र वीज साथ देत नसल्‍याने नागरिकांना पाण्‍यासाठी भटकंती करावी लागत आहे. केवळ वीजेमुळे गावात पाण्‍याची समस्‍या निर्माण झाली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
 
Top