उस्मानाबाद -: येत्या खरीप हंगामात खते, बियाणे आणि कर्जपुरवठा यांचा शेतक-यांना वेळेवर पुरवठा होईल, याबाबत नियोजन करावे. या खरीप हंगामात शेतकरी अडचणीत येणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले.
      येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक-२०१३-१४ पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, कृषी सभापती पंडित जोकार, महिला व बाल कल्याण सभापती सविता कोरे, पंचायत समिती सभापती प्रेमलता लोखंडे, कृषि सहसंचालक सु. ल. जाधव, लक्ष्मण सरडे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
     यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी कृषी विभागाने येत्या खरीप हंगामात खते, बियाणे वाटपाबाबत केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. यावर्षी बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्याच्या उदिष्‍टपुर्तीसाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाऊस वेळेवर झाला तर शेतकरी अडचणीत येवू नये, यासाठी बँकांनी वेळेवर कर्जपुरवठा करावा. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर बैठक घेवून बँकांना सूचित करावे. मागीलवर्षी अपेक्षित कर्ज पुरवठा न करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
     सलग दोन वर्ष कमी पाऊस झाल्याने यावर्षी उसाचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर बियाण्यांची मागणी वाढणार आहे. त्याचे नियोजनही आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत बियाणांचा अथवा खतांचा काळाबाजार होणार नाही अथवा अनाधिकृत विक्री होणार नाही, याबाबत कृषी विभागाने दक्षता घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.
     खासदार डॉ. पाटील यांनी कृषी विभागाने शेतक-यांना ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करण्याची गरज पटवून दयावी, असे आवाहन केले.
      आमदार ओमराजे निंबाळकर यांनी पाणलोट विकासाची कामे गतीने व्हावीत तसेच बँकांना त्यांच्या डिपॉजीटच्या प्रमाणात कर्ज पुरवठा करण्याबाबत ताकीद दयावी, अशी मागणी केली.
      प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. येत्या खरीप हंगामात ४ लाख ३६ हजार हेक्टर खरीप क्षेत्र असेल,असे गृहीत धरुन नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याची बियाणे मागणी ६५ हजार २९६ क्विंटल इतकी असून खत मागणी ८५ हजार ६०० क्विंटल असल्याचे त्यांनी सांगितले.कृषी विकास अधिकारी मदनलाल मिनीयार यांनी स्वागत केले.

 
Top