नवी दिल्ली : दुष्काळसदृश परिस्थितीनंतर शेतकर्यांना आतुरता लागलेला नैऋत्य मान्सून येत्या ३ जून रोजी केरळ किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती बुधवारी हवामान विभागाने दिली आहे. हा अंदाज शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांसाठी चिंतेची बाब असली तरीही बंगालच्या खाडीत 'महासेन' चक्रीवादळाने निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या महिन्यात हवामान विभागाने पहिल्यांदा हवामान पत्रक जाहीर करत शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला होता. यंदा मान्सून समाधानकारक म्हणजेच ९८ टक्के बरसेल, असे त्यावेळी हवामान विभागाने म्हटले होते. त्यातच 'महासेन' चक्रीवादळामुळे निर्माण झालेले पोषक वातावरण पाहता मान्सूनबाबत शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या आशा उंचावल्या आहेत.
बुधवारी हवामान विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजपत्रकानुसार नैऋत्य मान्सून येत्या ३ जून रोजी केरळात धडकणार आहे. अपेक्षेपेक्षा मान्सूनचे हे आगमन उशिरा होत असले तरीही ही चिंतेची बाब नसल्याचे सांगत हवामान विभागाने शेतकर्यांना दिलासा दिला आहे. तसे पाहता यंदा मान्सून समाधानकारक मानला जात असला तरीही मान्सून आल्याच्या दोन आठवड्यानंतरच पावसाळ्य़ाबाबत निश्चित अंदाज बांधता येईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या बंगालच्या उपसागरावर घोंगावणार्या 'महासेन' चक्रीवादळामुळे मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी भारताच्या दक्षिण किनारपट्टीला मान्सून ठराविक वेळेतच धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे 'महासेन' वादळामुळे बंगालची खाडी आणि अंदमान-निकोबार बेटांसह परिसरात येत्या एक-दोन दिवसातच मान्सूनपूर्व सरी बरसतील, असे हवामान विभागाने सांगितले आहे. बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेला दबाव मान्सूनला किनारपट्टीकडे खेचेल. त्यामुळे तो ३0 मेनंतर कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता नुकतीच हवामान खात्याने वर्तविली आहे.