नळदुर्ग -: पिंपळा (खु) ता. तुळजापूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्‍त काढण्‍यात आलेल्‍या मिरवणुकीवर दगडफेक केल्‍याने  चारजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना घडली. याप्रकरणी नऊ जणांविरूद्ध अँट्रॉसिटीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. या घटनेमुळे पिंपळा येथे अनुचित प्रकार घडू नये याकरीता खबरदारीचा उपाय म्‍हणून कडेकोट पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.
    सीमा डावरे, कोंडाबाई मस्के, सत्यवान मस्के, आशा मस्के,(सर्व रा. पिंपळा खु, ता. तुळजापूर) असे दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्‍यांचे नावे आहेत. तर महेश राजेंद्र कदम, अनिल प्रभाकर धनके, शशीकांत महादेव कदम, महादेव नरहरी कदम, धनाजी दामू कदम, आप्पा मारुती कदम, राहुल तानाजी ढेकणे, तुकाराम धनके, स्वप्नील अनिल धनके (रा. पिंपळा खु) यांच्‍याविरूद अँट्रॉसिटीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्‍त दि. 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची प्रतिष्‍ठापना पिंपळा येथील दलित वस्‍तीत करण्‍यात आले होते. त्‍यानंतर दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली. ही मिरवणूक गावातील वेशीजवळ चौकात आली असता, सात वाजण्‍याच्‍या सुमारास अचानक वीजपुरवठा बंद झाल्‍याने जनरेटरच्‍या उजेडामध्‍ये मिरवणुक सुरु होती.  त्यावेळी दलित व सवर्ण तरुणांमध्ये घोषणाबाजीने वादास सुरुवात झाली आणि अचानक मिरवणुकीवर दगडफेक झाली. झालेल्या दगडफेकीत सीमा डावरे, कोंडाबाई मस्के, सत्यवान मस्के, आशा मस्के हे चौघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिरवणुकीसाठी उस्मानाबाद येथून खास पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. याप्रकरणी लक्ष्मण शिवाजी मस्के (रा. पिंपळा खु) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तामलवाडी पोलिस ठाण्यात बुधवारी पहाटे वरील नऊजणांविरूद्ध अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा घारगे या करीत आहेत.
बंदोबस्त असतानाही दगडफेक
पिंपळा (खु) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने गावात तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा घारगे, सपोनि दिलीप जाधव आदींसह अन्य ३ अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून होते. यापूर्वी शांततेच्या बैठका घेवून दोन्ही समाजातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले होते. तरीही काही विकृत लोकांनी दगडफेक करुन गालबोट लावले त्यानंतर वाढता तणाव पाहून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. गुन्हा दाखल करण्यासाठी पिंपळा (खु) येथील दलित बांधवांचा जमाव पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. दोघा आरोपींना मंगळवारी रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले.
शांततेसाठी प्रशासनाचा पुढाकार
पिंपळा खुर्द येथील हा प्रकार घडल्यानंतर प्रशासनाने वेगवान हालचाली करुन गावात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे तसेच पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी प्रथम दोन्ही गटांच्या वेगवेगळ्या बैठका घेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर दोन्ही गटांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांनी केले.
३0 जणांविरुध्द गुन्हा दाखल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीत दगडफेक का केली या कारणावरुन संगनमत करुन चौघाजणांना हत्याराने मारहाण केली. यात चौघेजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ३0 जणांवर तामलवाडी ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.ही घटना पिंपळा (खु) येथे ३0 एप्रिल रोजी रात्री ७.३0 वाजता घडली.
     मारहाणीत नाना बिभीषण कदम, अशोक आप्पा पाटील, दत्तात्रय गणपत कदम, स्वप्नील अनिल धनके हे चौघे गंभीर असून, त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात किशोर मस्के, लखन मस्के, उमेश मस्के, सहदेव जाधव, महादेव जाधव, झुंबर मस्के, साईनाथ मस्के, कालिदास मस्के, सुखदेव मस्के, गणेश मस्के, पप्पु मस्के, बापू मस्के,जालिंदर मस्के, बाळु मस्के, महेश मस्के, अनिलकुमार भोसले, रुद्रप्पा मस्के, अभिमान ढवळे, ज्ञानदेव मस्के, जगन्नाथ मस्के, विनायक मस्के, गोविंद कांबळे, समु मस्के, वनीता मस्के, इंद्रकाळ मस्के, अनिता मस्के, यशोदा मस्के, दिलीप मस्के, संजय मस्के यांच्यासह ३0 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास सपोनि दिलीप जाधव हे करीत आहेत.
 
Top