सोलापूर -: दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच मोठ्या प्रमाणावर विविध योजना राबवून पाणी साठ्याचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
    सांगोला तालुक्यातील चिनके येथे जनावरांच्या छावणीस्थळावर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आ. गणपराव देशमुख, माजी आमदार शहाजी बापु पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, सलग दुस-या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याचा दुष्काळ व जनावरांच्या चा-यांचे आव्हान उभे राहिले. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने न भुतो न भविष्यती अशी यंत्रणा उभी करुन उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी भागासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्याबरोबरच कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावरही शासन प्रयत्न करीत आहे. यामध्ये सिमेंट नाला बांध, मोठ्या प्रमाणावर शेततळी घेणे व लोकसहभागातुन गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. याद्वारे साठवण क्षमता वाढुन जमीनीची उत्पादकता वाढली जाणार आहे. विहिर पुनर्भरणाचे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
    जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अतिशय चांगल्या पध्दतीने नियोजन करुन अंमलबजावणी केली जात आहे. आणखी दीड दोन महिने पाऊस पडेपर्यंत यापध्दतीनेच नियोजन करुन मात केली पाहिजे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या समन्वयातुन जिद्दीने व योग्य प्रयत्नाने दुष्काळाचा समर्थपणे मुकाबला करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात कोयना धरणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु अन्य काही भागातही मोठ्या योजना व धरणातील पाणी वापरण्याबाबत नियोजन केले जात आहे. टेंभु व  म्हैसाळ आदि योजनांतुन या भागांना पाणी मिळण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन नियोजन केले जाईल. परंतु तोपर्यंत आहे त्या पाण्याचा योग्य वापर करावा जनतेने आपला पाणी वाटा व लोकसहभागाद्वारे विविध उपाययोजनांसाठी पुढे यावे. सद्याची सुरु असलेली कामे आणखी वेगाने करण्यासाठी व विविध योजनांद्वारे कायमस्वरुपी उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. या वर्षीचा दुष्काळ हा शेवटचा दुष्काळ ठरावा. पुन्हा अशी वेळ येणार नाही यादृष्टीने नियोजन करु या असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
    याप्रसंगी आ. गणपराव देशमुख यांनी टेंभु योजनेचे पाणी अंतिम टप्प्यात आहे. ते काम लवकर पूर्ण करावे तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत विविध सुचना मांडल्या.
    या दौ-यात मुख्यमंत्री यांनी चिनके येथील चारा छावणीस भेट देऊन छावणी चालकांशी याबाबत चर्चा करुन छावणीमध्ये किती जनावरे आहेत, जनावरांना ऊस, चारा , पेंड आदि खाद्य व पाणी मिळते का याबाबत चौकशी केली. तसेच उपस्थित पशुपालकांशीही संवाद साधला.
 
Top