सोलापूर -: दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बँकांनी गाळ काढणे, पाण्याच्या टाक्या देणे, पशुखाद्य, कडबा देणे आदीसाठी मदत देऊन योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात जिल्हयातील बँक अधिका-यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, दुष्काळामुळे शेतक-यांचे लघु व मध्यम मुदतीचे कर्ज असेल तर त्याच्या वसुलीबाबत मुदत वाढवून दयावी. याबाबतचे आदेश सर्व बँकेच्या प्रत्येक शाखेपर्यत पोहचवून त्याची अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देण्याच्या सुचना दिल्या. तसेच विविध महामंडळाच्या व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची कर्ज प्रकरणे प्राधान्यांनी मंजूर करावीत. त्याचप्रमाणे गरजू लाभार्थ्यांना शैक्षणिक कर्ज ही मंजुर करण्याचे आवाहन केले.
    जिल्हयाच्या यावर्षीच्या अग्रणी बँकेचा वार्षिक पतपुरवठा आराखडयामध्ये 2296 कोटींचे पीक कर्जाचा समावेश आहे. यामध्ये रब्बी हंगामासाठी 1389 व खरीपसाठी 907 कोटी रुपये असल्याची माहिती अग्रणी बँकेच्या वतीने देण्यात आली. या बैठकीस विविध बँकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

एमआयडीसी अधिका-यांची बैठक

    यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ढोबळे यांनी एमआयडीसीच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, औद्योगिक वसाहतीत पाणी, रस्ते, वीज असेल तरच उद्योजक येतात. वीजेच्या प्रश्नाचा अभ्यास करुन गरजेप्रमाणे आवश्यक मागणी नोंदवावी. चिंचोली  एम.आय.डीसी साठी पुढील काळात शाश्वत पाण्यासाठी पाण्याचा पर्यायी उदभव निश्चित करावा. तसेच गेल्या पाच सहा वर्षापासून ज्यांना प्लॉट दिले आहेत त्यांनी काही केले नसेल तर नियमाप्रमाणे नोटीस देवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे त्यांच्या अडचणी जाणून घेवून मार्गदर्शन केले.
    या बैठकीला एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक  काळोखे, प्रादेशिक अधिकारी प्रल्हाद चव्हाण, कार्यकारी अभियंता वराळे, उपअभियंता कोळप आदि उपस्थित होते.
 
Top