प्रतिकात्‍मक
नळदुर्ग -: येथील एसटी बसस्‍थानकात तुळजापूर आगाराची मुक्‍कामी असलेली एसटी बस अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्‍याने एकच खळबळ उडाली.
    राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील नळदुर्ग येथील बसस्‍थानकात एसटी बस (क्रमांक एम.एच. 20 बी.वाय. 0586) तुळजापूर-नळदुर्ग-अक्‍कलकोट बस तुळजापूर बसस्‍थानकातून दि. 27 मे रोजी दुपारी साडे बारा वाजता नेहमीप्रमाणे निघाली. ती दुपारी दीड वाजण्‍याच्‍या सुमारास नळदुर्ग बसस्‍थानकात आली. नळदुर्ग येथून सदर बसचालक बाबू परसराम राठोड यानी दुपारी दीड ते सायंकाळी साडे सात वाजण्‍याच्‍या दरम्‍यान नळदुर्ग ते अक्‍कलकोट असे दोन नियमित फे-या पूर्ण करुन सदर बस नळदुर्ग बसस्‍थानकात मुक्‍कामास थांबली. मध्‍यरात्रीनंतर केंव्‍हातरी अज्ञात चोरट्याने बसस्‍थानकातून वरील क्रमांकाची बस चोरुन नेल्‍याचे वाहतूक नियंत्रक अधिकारी ज्‍योती दस यानी तुळजापूर आगारप्रमुख दिवटे यांना कळविले. त्‍यावरुन बसची शोधाशोध चालू असताना माळुंब्रा ते सांगवी मार्डी दरम्‍यान बस उभी असल्‍याचे माहिती मिळाल्‍यावरुन घटनास्‍थळी जावून पाहणी केली. यावेळी समोरील काच, समोरील टायर नसल्‍याचे आढळून आले.
    सदर बस सोलापूर-तुळजापूर रोडवर माळुंब्रा गावानजीक रस्‍त्‍याच्‍या कडेला बस सोडून अज्ञात चोरट्याने पळ काढल्‍याचे उघडकीस आले. राजकुमार मारोतीराव दिवटे (वय 44, आगारप्रमुख रा.प.म. तुळजापूर) यांनी फिर्याद दिल्‍यावरुन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
 
Top