नळदुर्ग -: 'म्‍हातारी मेली त्‍याचं दुःख नाही, पण काळ सोकावतयं'  या उक्‍तीप्रमाणे ऐन दुष्‍काळात पाणीपुरवठा यंत्रणेने पिण्‍याचे पाणी म्‍हणून दुर्गंधीयुक्‍त व गाळमिश्रित रंगीबेरंगी पाणीपुरवठा करुन नंगानाच करीत असल्‍याची संतापजनक प्रतिक्रिया नळदुर्ग शहरवासियांतून व्‍यक्‍त केली जात आहे. दरम्‍यान, गेल्‍या चाळीस वर्षामध्‍ये पहिल्‍यांदाच यावर्षी नळदुर्गकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आगामी काळात शुध्‍द पाणीपुरवठा करण्‍याची मागणी नागरिकांतून केली जात आहे
    नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पातून तुळजापूर, नळदुर्ग शहरासह अणदूर गावास पाणीपुरवठा करण्‍यात येतो. बोरी धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रामध्‍ये गतवर्षी अत्‍यल्‍प पाणी पाऊस झाल्‍याने नवीन पाणी आले नाही. त्‍यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सध्‍या बोरी धरणातून नळदुर्ग शहराला पाच दिवसाला एकदा पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. बोरी धरणाच्‍या पाणीसाठ्यामध्‍ये लक्षणीय घट झाली असल्‍यामुळे गाळमिश्रित पाणीपुरवठा केले जात असले तरी हेच पाणी श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी देखील केला जातो. ते पाणी जलशुध्‍दीकरण करुन पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र नळदुर्ग येथील जलशुध्‍दीकरण केंद्रातून पाणी शुध्‍दीकरण होत नसल्‍याने शहराला गाळमिश्रित पाणीपुरवठा केला जात असल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यातही वारंवार व्‍यत्‍यय येत असल्‍याने आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. गेल्‍या अनेक दिवसांपासून शहरात होणारा पाणीपुरवठा रंगीबेरंगी, दुर्गंधीयुक्‍त व गाळमिश्रित होत आहे. त्‍यामुळे हे पाणी पिण्‍यास आरोग्‍यास योग्‍य नसतानाही काहींना हेच पाणी प्‍यावे लागत आहे. त्‍यामुळे अनेकजण पोटदुखीने आजारी पडत असल्‍याची चर्चा होत आहे.
    तीव्र पाणीटंचाईचा परिणाम लग्‍नसराईत लग्‍नघरी येणा-या पाहुण्‍यांवर होत आहे, कारण ज्‍या घरी लग्‍न आहे त्‍या घरचे लोक आपापल्‍या पाहुण्‍यांना पाणीटंचाई असल्‍यामुळे लग्‍नाच्‍या दिवशीच घरी या असा निरोप देत आहेत. त्‍यामुळे लग्‍नघरी दिसणारी पाहुण्‍यांची वर्दळ यंदाच्‍या वर्षी कमी दिसत आहे. पाणीसाठा घटण्‍याचे प्रमाण पाहून बोरी धरणाच्‍या पात्रात अनेकांनी बोअर घेऊन पाणी पाईपद्वारे इतर ठिकाणी शेतीसाठी वापरत असलेल्‍या शेतक-यावर प्रशासनाने निर्बंध घालणे गरजेचे आहे. तरच लोकांना पाणी पिण्‍यासाठी चार दिवसाला एकदा तरी मिळेल अन्‍यथा पाण्‍यासाठी आंदोलन करण्‍याची मानसिकता नळदुर्गकरांची झाली आहे. पिण्‍याचे पाणी मिळविण्‍यासाठी टमटम, टँकर मोटारसायकल, रिक्षा, सायकल आदी वाहनांचा उपयोग नागरीक करत आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृध्‍दाची पाण्‍यासाठी दररोज कसरत चालू आहे.
    नळदुर्ग शहरातील भीमनगर, बौध्‍दनगर, शिवकरवाडी या दलित भागासह रहिमनगर, बसस्‍थानक परिसरात एकही हातपंप किंवा बोअर चालू नसल्‍याने या भागातील मागासवर्गीय नागरिकांसह इतरांनाही पाण्‍यासाठी शहराबाहेर दुरवरुन शेतातून पाणी आणण्‍यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या भागात काही सधन मंडळीकडे खासगी विंधन विहीर आहे. मात्र हे विंधन विहीरवाले खुलेआम चढ्याभावाने पाण्‍याची राजरोसपणे विक्री करीत आहेत. बसस्‍थानकाच्‍या पाठीमागे असलेल्‍या शेखर खद्दे यानी आपल्‍या मालकीच्‍या खासगी विंधन विहीरीतून सर्वसामान्‍य नागरिकांना मोफत पिण्‍याचे पाणी गेल्‍या अनेक दिवसांपासून देत आहेत. त्‍याचबरोबर परिसरातील काही शेतकरी शेतात आलेल्‍या नागरिकांना पिण्‍याचे पाणी विनामूल्‍य देऊन माणुसकीचे नाते जपले आहे.
    यापुढे जलशुध्‍दीकरण केंद्रातील अडचण दूर करुन नगरपालिका प्रशासनाने शुध्‍द पाणीपुरवठा करावे, अन्‍यथा नागरिकातून तीव्र आंदोलन छेडण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे.
 
Top