धुळे : तीन दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहिने मुलाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. तरुणी लग्नाआधीच गरोदर असल्याची माहिती लपवून ठेवून फसवणूक केल्याची तक्रार नवरदेवाने केली आहे. या घटनेनंतर नववधू-वराच्या नातेवाईकांमध्ये वाद झाल्याने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. यासंदर्भात मात्र पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
       तालुक्यातील न्याहळोद (पिंप्री) येथील तरुणाचा विवाह दि.२ मे रोजी पानखेडा ता.साक्री येथील तरुणीशी झाला. विवाहानंतर दि.४ रोजी रात्री ३.४५ वाजेच्या सुमारास ती नववधू शौचाला जाते असे सांगून घराबाहेर गेली आणि प्रसूत झाली. तिने मुलाला जन्म दिला. तिला तिच्या पतीने लागलीच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत विवाहितेच्या माहेरी कळविण्यात आले. त्यानंतर तिचे नातेवाईक सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. लग्नाआधीच मुलगी गरोदर असतांना ही बाब लपवून ठेवली. त्यामुळे लग्नात झालेला खर्च परत द्यावा, असे म्हणत नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी मुलीच्या नातेवाईकांशी वाद घातला. तर लग्नासाठी १ लाख ६६ हजार रुपये हुंडा दिला आहे. ही रक्कम व इतर झालेला खर्च नवरदेवाने द्यावा, असे सांगत मुलीच्या नातेवाईकांनीही वाद घातला. त्यातून जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. आज सकाळी ६ वाजेपासून हा प्रकार सुरु होता. काही ज्येष्ठ नागरिकांनी दोन्ही पक्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे वाद अधिक चिघळला. दुपारी १२ वाजेपर्यत हा प्रकार सुरु होता. दोन्ही पक्षात तडजोड झाल्यानंतर वादावर पडदा टाकण्यात आला. जिल्हा रुग्णालय प्रशासनानेही प्रसूत नवविवाहिता व तिच्या बाळाला रुग्णालयातून सुट्टी दिली.

* साभार : दै. पुण्‍यनगरी
 
Top