फेसबुक वापरत असाल तर सावध व्हा, 'फेसबुक' चा अतिवापर आपल्याला मानसिक रुग्ण करू शकतो, असा इशारा नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून करण्यात आला आहे. फेसबुक आणि इतर सोशल माध्यमांच्या वापरामुळे एकाग्रता भंग होऊन मानसिक आघात होऊ शकतात.
    युवक-युवतींपर्यंत मर्यादित राहिलेल्या चॅटिंग आणि सोशल माध्यमांच्या वापरावर आता वयाचे बंधन राहिलेले नाही. फेसबुक जगभरातील लोकांची दैनंदिनी झाला आहे. मात्र, अशा प्रकारचे सोशल माध्यम मानसिकतेला किती घातक ठरू शकतात, यावर लक्ष केंद्रित करून इस्रायलच्या विद्यापीठाने संशोधन सादर केले आहे. त्यानुसार सोशल माध्यम कुणालाही इंटरनेटचे वेड लावू शकते. 'सोशल माध्यमांमुळे मानसिक रुग्ण झालेल्यांची अनेक उदाहरणे या संशोधनातून मिळाली आहेत. त्यापैकी अनेकांनी एकटेपणा, नैराश्य आणि मानसिक त्रस्त झाल्याची तक्रार केली,' असे मुख्य संशोधक तसेच इस्रायलच्या तेल-अविव विद्यापीठातील मानसिक रुग्ण विभागाचे प्राध्यापक डॉ. युरी नित्झान यांनी सांगितले. 
       सोशल माध्यमांच्या अतिवापरामुळे लोक इंटरनेटचे व्यसनी होतात, तसेच आभासी नातेसंबंधांना बळी पडतात, असेही ते पुढे म्हणाले. या संशोधनात सोशल माध्यमांचा वापर करणार्‍या अनेक व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी अनेकांमध्ये एकसारखेच दुष्परिणाम जाणवले. विशेष म्हणजे या प्रकारच्या मानसिक रोगाचे बळी ठरलेल्या रुग्णांवर बाहेरून उपचार करणे शक्य नाही. सोशल माध्यमांचा बळी गेलेल्यांनी स्वत: संकल्प केल्यास ते सहज यातून बाहेर पडू शकतात, असेही डॉ. नित्झान यांनी सांगितले.

* साभार : दै.पुण्‍यनगरी

 
Top