उस्‍मानाबाद -: उस्‍मानाबाद जिल्‍ह्याच्‍या ऐतिहासिक व धार्मिक स्‍थळांच्‍या पर्यटन विकासाबाबत ऑक्‍सीनो कॅपीटल सर्व्हिसेस या कंपनीमार्फत सध्‍या जिल्‍ह्याच्‍या ऐतिहासिक व धार्मिक स्‍थळांच्‍या विकासाचा आराखडा तयार करण्‍याचे काम सुरु असून पुढील वीस वर्षाचा पर्यटनविकास गृहीत धरुन हा आराखडा तयार करण्‍यात येत असल्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी सांगून याबाबतचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर पर्यटन विकासकामांना चालना मिळणार आहे. या प्रारुप आराखड्यात जिल्‍ह्यातील इतिहासप्रेमी नागरिकांच्‍या सूचना व दुरुस्‍त्‍या समाविष्‍ठ केल्‍या जाणार आहेत. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील पर्यटन स्‍थळांचे कायापालट होणार आहे.
    उस्‍मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले, लेणी, निसर्गरम्य स्थळे, धार्मिकस्थळे यासह विविध वास्‍तू व स्‍थळाच्‍या ठिकाणी पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राथमिक स्वरुपाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, उस्मानाबाद, परंडा, भूम, कळंब आदी तालुक्यातील जवळपास ३८ पर्यटन स्थळांचा विकास होणार आहे. त्‍यामध्‍ये जिल्‍ह्यातील श्री तुळजाभवानी मंदीर तुळजापूर, नळदुर्गचा ऐतिहासिक किल्‍ला, रामतीर्थ नळदुर्ग, खंडोबा मंदीर अणदूर, महादेव मंदीर ढोकी, गोरोबाकाका मंदीर व पुराण वस्‍तू संग्रहालय, शिवमंदीर तेर, धाराशिव लेण्‍या, हातलादेवी, धारासूर मर्दनी मंदीर उस्‍मानाबाद, परंडा किल्‍ला, रामलिंग मंदीर येडशी, दत्‍त मंदीर मलकापूर, येडेश्‍वरी देवी येरमाळा, कुंथलगिरी, कल्‍याण स्‍वामी मठ डोमेगाव, भैरवनाथ मंदीर सोनारी, दर्गाह जेवळी, हजरत खॉंजा दर्गाह परंडा, भागवती देवस्‍थान, अलंमप्रभू देवस्‍थान भूम, अचलबेट देवस्‍थान या स्थळांचा समावेश आहे.
    जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने आराखडा तयार करण्यात येत असून त्‍यामुळे विकासाला चालणार मिळणार आहे. त्‍याचबरोबर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पर्यटन स्थळे कात टाकणार आहे. या पर्यटन विकासामुळे अनेकांना रोजगारच्या संधी निर्माण होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी सांगून लवकरच त्‍या त्‍या क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍ती, लोकप्रतिनिधी यांची एक बैठक घेऊन त्‍यावर चर्चा करुन त्‍यांच्‍या सूचना जाणून घेण्‍यात येणार आहे. त्यानंतर पर्यटन स्थळांच्या या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी घेऊन कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्‍यांनी सांगितले.
 
Top