पंढरपूर -: गेल्‍या हजारो वर्षापासून सुख, शांती, समृध्‍दी घेऊन भीमा शंकर डोंगरातून वाहत आलेली भीमा नदी सध्‍या पाण्‍याअभावी कोरडी ठणठणीत पडली असून पंढरपूरात नदीचे पात्र पाहिल्‍यानंतर राजस्‍थानच्‍या वाळवंटात आल्‍याचा भास होत आहे. करोडो भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेली जीवनदायीनी चंद्रभागा दुष्‍काळाच्‍या दाहाने रुक्ष झाली असल्‍याचे पाहून भाविकांतूनही हळहळ व्‍यक्‍त होत आहे.
    पंढरपूचे येथे विठ्ठलाचे दर्शन आणि चंद्रभागेचे स्‍नान करण्‍यासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. दुष्‍काळाचे दिवस असले तरीही आजही येथे येणा-या भाविकांची संख्‍या कमी झालेली नाही. मात्र येथे आलेल्‍या भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेण्‍यापूर्वी चंद्रभागेच्‍या पाण्‍यात स्‍नान करता येत नाही, याचे शल्‍य बोचत आहे.
    गेल्‍या सहा महिन्‍यापासून दुष्‍काळामुळे भीमा नदी कोरडी पडली असून चंद्रभागेच्‍या पात्रात पाण्‍याचा एक थेंबसुध्‍दा दिसून येत नाही. एरव्‍ही पाण्‍यावर तरंगणा-या कोळ्यांच्‍या होड्या आता तापलेल्‍या वाळूवन म्‍हशी सारख्‍या बसकन मारुन बसलेल्‍या आहेत.
    पात्रातील पुंडलीकाच्‍या भेटीला आलेला भाविक चंद्रभागेच्‍या पात्राची दुरावस्‍था, रूक्षपणा पाहून उदासवाणा होऊनच विठ्ठल दर्शनासाठी जात असल्‍याचे दिसून येते. येथील बंधा-यात पिण्‍यासाठी पाणी राखून ठेवले असल्‍याने बंधा-याच्‍या आतील बाजूला ब-यापैकी पाणी असल्‍याचे सुखद चित्र आहे. मात्र त्‍या पाण्‍याचा भाविकांना कसलाच लाभ होत नाही. जानेवारी महिन्‍यापासून दर दोन महिन्‍यातून एकदा सोलापूरसाठी पाणी सोडले जात असून त्‍या काळात आठ-दहा दिवस तेवढे चंद्रभागेचे पात्र पाण्‍याने भरुन वाहत असते. ते पाणी बंद झाल्‍यानंतर मात्र पुन्‍हा हे पात्र कोरडे पडल्‍याचे आणि वाळवंट राजस्‍थानच्‍या वाळवंटासारखे रूक्ष झाल्‍याचे दुर्दैवी चित्र पंढरपूरकरांसह हजारो भाविकांनाही पाहावे लागत आहे.
 
Top