बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सोलापूर दूध संघातील कोट्यावधीच्‍या घोटाळ्यातील आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्‍याची चौकशी करण्‍याकामी संजय राऊत (उपनिबंधक सहकारी संस्‍था, सोलापूर) यांची अधिकृत चौकशी अधिकारी म्‍हणून नियुक्‍त केल्‍याचे पत्र दिग्‍वीजय राठोड विभागीय उपनिबंधक सहकारी संस्‍था (दुग्‍ध) पुणे विभाग यांनी दिले असून महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960 चे कलम 88 नुसार कारवाई होणार आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी, संघाने दि. 16 जुलै 2010 ते 30 ऑगस्‍ट 2010 मुदतीत कन्‍वर्शन करीता पाठविलेले दुध उत्‍पन्‍नाचा विचार न करता घेतल्‍याने 13,42,491 रुपयांचा तोटा झाला व मंजूर दरापेक्षा 1,28,200 रुपये जादा अनुदान दिले.
    100 मेट्रिक टन क्षमतेच्‍या जामगाव (ता. बार्शी) येथील पशुखाद्य कारखान्‍यात अतिरिक्‍त पशुखाद्य खरेदी करुन आर्थिक नुकसान झाले व 32, 35, 858 रुपये विना व्‍याजाचे भांडवलाची गुंतवणूक झाली. जनरेटर खरेदीची रक्‍कम मोठी असतानाही वृत्‍तपत्रात जाहिरात प्रसिध्‍द न करता खरेदी केले व आर्थिक नुकसान केले. बत्‍ककुलर खरेदी करताना जादा दराची खरेदी केली. पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, टेंभूर्णी, करमाळा या ठिकाणी बॉयलर खरेदी करताना जादा इंधन खर्च होणारे खरेदी करुन आर्थिक नुकसान केले.
    मंगळवेढा, सांगोला, मोहोळ येथील बांधकाम व पंढरपूर येथील केंद्रातील पाईपलाईन, इलेक्ट्रिक साहित्‍य, बर्फ कारखाना खरेदी करताना बँक गॅरंटीची पूर्तता न करता अँडव्‍हान दिल्‍याने 3,49,910 बिनव्‍याजी गुंतवणूक झाली.
    मंजूर उपविधीत उधार व्‍यवहारास मान्‍यता नसताना दुग्‍धजन्‍य पदार्थांची उधारीवर विक्री करुन 94,69,298 रुपये बिनव्‍याजी गुंतवणूक,  वाहतूक अँडव्‍हान्‍समध्‍ये 25.50 लाख रुपये येणे थकीत, नोकर अँडव्‍हान्‍समध्‍ये वसुली अल्‍प प्रमाणात, 1,41,98,400 रुपयांची दूध भुकटी पावडर विक्री करार नसताना विक्री, ठरावापेक्षा जादा 20 मेट्रीक टन पावडर खरेदी करुन आर्थिक नुकसान, जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत व इतर बँकेत 34,93,82,938 रुपयांची मुदत ठेव झाल्‍याची परवानगी न घेता ठेवली, गाय दुधात म्‍हैस दुध मिसळून आर्थिक नुकसान केले, उधारीवर सेवा पुरवल्‍याने 3,03,49,482 बिनव्‍याजी गुंतवणूक झाल्‍याने आर्थिक नुकसा, विविध ठिकाणी पाठविलेल्‍या 16 टँकर्स परत आल्‍याने जादा वाहतूक भाडे व प्रोसेसिंग खर्च 1,23,961 जादा खर्च झाल्‍याने नुकसान झाले, अशा प्रकारच्‍या गैरव्‍यवहारामुळे संस्‍थेचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
    सदरच्‍या संस्‍थेबाबत अशा प्रकारच्‍या कोट्यावधी रुपयांच्‍या आर्थिक घोटाळ्यांची तक्रार सन 2009-10 मध्‍ये संचाल‍‍क तथा पूर्वीचे चेअरमन कुंडलिकराव गायकवाड यांनी दिली होती. त्‍याची चौकशी करण्‍यासाठी चौकशी अधिकारी म्‍हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्‍ती केली होती. ती चौकशी कालावधी उलटूनही पूर्ण झाली नसतानाच शासनाने सन 2010-11 मधील गैरव्‍यवहाराची चौकशी करण्‍याकामी संजय राऊत यांची नियुक्‍ती करुन यातील दोषींची नावे निश्चिती करण्‍याबा‍बत आदेश दिले आहेत.
    सदरच्‍या घोटाळ्यामुळे दीड लाख उत्‍पादक सभासद व अडीच हजार संस्‍थांची फसवणूक झाल्‍याने त्‍यांना यापूर्वी दिला जाणारा बोनस मिळाला नाही.
 
Top