उमरगा -: महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍यावतीने सुरु करण्‍यात आलेल्‍या आष्‍टामोड (ता. लोहारा) येथील चारा छावणीला मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवार दि. 3 मे रोजी दुपारी एक वाजता भेट देऊन पाहणी केली.
    सोलापूरहून आष्‍टामोड येथील चारा छावणीस राज ठाकरे यांनी भेट देऊन जनावरांची व चारा व्‍यवस्‍थापनाची पाहणी केली.  यावेळी आणखीन आवश्‍यक ती मदत देण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी शेतक-यांना दिले. शेतकर्‍यांशी थोडावेळ त्यांनी संवादही साधला. यावेळी त्यांनी जनावरांसाठी आणखी काही करण्याची आवश्यकता असल्यास कळवण्याचे सूचित करून आणखी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ठाकरे यांना पाहण्यासाठी तसेच त्यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्याबाहेरूनही कार्यकर्ते येथे दाखल झाले होते. छावणीचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कार्यकर्ते व युवक वाहनांच्या टपावर व झाडावर चढून बसले होते. यावेळी ठाकरे काही बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र ठाकरे काहीही न बोलताच निघून गेले. यामुळे सर्वांचीच निराशा झाली. छावणीला भेट दिल्यानंतर ठाकरे यांनी उमरगा चौरस्ता येथील एका हॉटेलमध्ये भोजन घेतले. उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात थोडा वेळ थांबून ते पुन्हा लातूरला रवाना झाले. पत्रकारांशीही बोलण्यास ते यावेळी टाळले. सर्वत्र दुष्‍काळ सदृश्‍य परिस्थितीवर उपाय, टीका-टिप्‍पणी, आरोप-प्रत्‍यारोप विरोधकातून करण्‍यात येत असतानाच राज ठाकरे याविषयी न बोलल्‍याने कार्यकर्ते व ठाकरेप्रेमी नागरीकातून आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.
 
Top