बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बचतगट हे महिला सक्षमीकरणाचे उत्‍तम साधन आहे व नगरपालिकेच्‍या सुवर्णजयंती विभागामुळे अनेक कुटुंबाचे आर्थिक स्‍थैर्य चांगले झाल्‍याचे आ. दिलीप सोपल यांनी म्‍हटले.
     बार्शी नगरपरिषदेच्‍यावतीने धनादेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्‍यक्ष कादर तांबोळी, राष्‍ट्रवादीचे गटनेते नागेश अक्‍कलकोटे, नगरसेविका मंगल शेळवणे, बांधकाम सभापती बप्‍पा कसबे, पाणीपुरवठा सभापती देविदास शेटे, गणेश जाधव, खॉंजाबी पठाण, संदिप बारंगुळे, बाबुराव जाधव, शैलजा सोडळ आदीजण नगरसेवक उपस्थित होते.
    बार्शी नगरपरिषदेच्‍या सुवर्णजयंती रोजगार विभागांतर्गत 421 लाभार्थ्‍यांना 17 कोटी 69 लक्ष रुपये स्‍वयंरोजगारासाठी कर्जपुरवठा, 139 गटांना रुपये 1 कोटी 60 लक्ष, 64 डॉका गटांना रु. 13 कोटी 95 लक्ष, 1530 जणांना प्रशिक्षणासाठी रु. 1 कोटी 51 लक्ष खर्च करण्‍यात आले. 4 हजार 197 कुटुंबातील महिलांना ख-या अर्थाने सक्षम करण्‍याचे काम झाले आहे.
    बार्शी नगरपरिषदेच्‍यावतीने लौकिक वाढविण्‍याचे काम अलिकडच्‍या काळात प्रशासन आणि सत्‍ताधारी राष्‍ट्रवादी गटाने केले आहे. महाराष्‍ट्रात व‍िविध प्रकारचे शासन निधी मिळविण्‍यासाठी बार्शी आघाडीवर असून नागेश अक्‍कलकोटे यांचे कार्य कौतुकास्‍पद आहे. नगरपरिषदेच्‍या उत्‍पन्‍नाची साधने वाढवून लौकिक कायम ठेवल्‍याने प्रशासन देखील कौतुकास पात्र आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका अरुणा परांजपे यांनी तर कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी दिलीप नान्‍नजकर, नागजी लामतुरे यांनी परिश्रम घेतले.
 
Top